गोड चेहरा, लांब केस, डोक्यावर
मोरपंखी मुकूट आणि हातात बासरी... कृष्णाचं हे एकंदर वर्णन ऐकलं की सगळ्यात आधी
डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी... कृष्णाची छवी आपल्या सगळ्यांच्या
मनात बसवणारा रामानंद सागर यांचा हा कृष्णा रणांगण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा
एकदा आपल्या बासरीच्या सूरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.
कृष्णातल्या
स्वप्नीलची एक वेगळी जागा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे आता बासरी हातात घेऊन
स्वप्नील खलनायकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा कोपरा काबिज
करणार आहे. कृष्णातला गोड स्वप्नील आता खलनायकाच्या डोळ्यात दिसणारा रोष
आपल्यासमोर घेऊन येतो आहे. या रोषामागचं कारण चित्रपटात स्पष्ट होणार असलं तरी
एकंदर ट्रेलर पाहता स्वप्नीलने साकारलेल्या या खलनायकाची भिती नायिकेच्या
चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते. यावरून कृष्णाची भूमिका साकारणारा हा तोच अभिनेता
आहे,
यावर विश्वासच बसत नाही.बासरी सोडली तर या दोन्ही
भूमिकांमध्ये तसं बघितलं तर कोणतंही साम्य नाही. असं असलं तरी कृष्णाला मिळालेली
प्रसिध्दी श्लोकलाही मिळेल असा विश्वास प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राकेश सारंग यांचं असून 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे
फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित
रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर
सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन,
स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.
हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
होत आहे.