माधुरीच्या वाढदिवसानिमित्त बकेट लिस्ट चित्रपटाचं'तू परी' रोमँटिक गाणं प्रसारित
येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटातील "होऊन जाऊ द्या!" या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं 'तू परी' हे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित होऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे.
'बकेट लिस्ट' चित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता 'बकेट लिस्ट' चित्रपटातील 'तू परी' या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असो, संगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.
माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्ट' चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार 'तू परी' हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. 'तू परी' या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलेले आहे. 'तू परी' गण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.
लंकावी सारखे नयनरम्य लोकेशन, माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं 'तू परी' हे सूर मधुर गाणं म्हणजे आपल्यासाठी खरी-खुरी रोमँटिक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही.
धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित, लेखिका देवश्री शिवडेकर आणि दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखित, डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट’ येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलं, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि माधुरी दीक्षित व सुमित राघवन यांच्या रोमॅन्सने भरलेलं 'तू परी' हे गाणं आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला भाग पाडेल यात काही शंकाच नाही.