सुपरस्टार अंकुश चौधरीची नवी भूमिका 'लेट्सफ्लिक्स मराठी' ह्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये इनव्हेस्टर म्हणून केली एन्ट्री
'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरी याने गुंतवणूक केली आहे. दगडी चाळ, दुनियादारी, ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्याचा सिनेक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य लेट्सफ्लिकला यशाच्या वाटेवर नक्कीच नेईल, याची सर्वांना खात्री वाटते.
प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्क चे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच 'लेट्सफ्लिक्स मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या घोषणेपासून मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
या भागीदारी संदर्भात अंकुशला विचारले असता, अंकुश म्हणाला, "मला 'लेट्सफ्लिक्स मराठी' ची संकल्पना आवडली आणि जेव्हा नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर हे संस्थापक असल्याचे समजले तेव्हा अशा टॅलेंटेड लोकांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल म्हणून मी लगेचच यासाठी सहमती दर्शवली. मराठी मनोरंजन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि मराठी आशयासाठी असलेल्या या स्वतंत्र ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी कलाकारांना नामी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर आणि नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत काम करायला ही मजा येईल, कारण दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि आम्ही तिघे मिळून जगभरातील मराठी भाषिक प्रेक्षकांना चांगला मराठी आशय (कंटेंट) देण्यासाठी प्रयत्नशील असू."
अंकुशच्या येण्याने नरेंद्र फिरोदिया म्हणाले, "अंकुशने 'लेट्सफ्लिक्स मराठी'त येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मला आनंद वाटतो. अंकुश एक अनुभवी आणि यशस्वी अभिनेता आहे. लेट्सफ्लिक्स विविध कंटेंट उपलब्ध करून देणारे व्यासपीठ असणार आहे आणि अंकुश एक अभिनेता असल्याने तो प्रेक्षकांच्या आवडीनिवडी तसेच प्रेक्षकांना काय हवे आहे हे समजून घेऊ शकतो."
या ओटीटी प्लेटफॉर्म्सचे सह-संस्थापक राहुल नार्वेकर आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, "जेव्हा मी अंकुशला भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आले की, मराठी प्रेक्षकांसाठी काय हवे आहे याचे बारकावे समजून घेण्यास आम्हाला त्याची मदत होईल. त्याच्यासोबत लेट्सफ्लिक्सवर काम करायला मला नक्कीच आवडेल".
गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोचले आहे. अशातच 'लेट्सफ्लिक्स मराठी' च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेबसिरीज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीस्, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.