नुकतीच नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू झाली आहेत. त्यामुळे नवनव्या सिनेमांच्या घोषणा देखील होत आहेत. अनेक कलाकार सिनेमांच्या चित्रीकरणासाठी विविध देशात जात आहेत. मराठमोळा रांगडा अभिनेता ‘विराट मडके’ त्याच्या नव्या सिनेमासाठी मॅंगलोरला रवाना झाला आहे. ही माहिती त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करत शेअर केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मिडीयावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता विराट हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याने ‘केसरी’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याने प्रायोगिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. तसेच त्याने अनेक एकांकिकांमध्ये कामे केली आहेत. ‘केसरी’ सिनेमासाठी त्याने त्याच्या शरीरावर बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याच्या भूमिकेची सिनेसृष्टीत चर्चा रंगली होती.
अभिनेता विराट मडके त्याच्या नव्या सिनेमाविषयी सांगतो, “एक कलाकार म्हणून मला वेगळ्या धाटणीचा सिनेमा आणि भूमिका साकारायची इच्छा होती. अगदी तश्याच प्रकारची संधी मला निर्माते दिपक राणे यांनी त्यांच्या नव्या सिनेमामध्ये दिली. त्यामुळे मी या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी फारच उत्सुक आहे.”
आता अभिनेता विराट मडके त्याच्या नव्या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.