'बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे
प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा 'बॉईज ३' हा चित्रपट एक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा धैर्या, ढुंग्या आणि कबीरने अवघ्या महाराष्ट्रात धमाका केला आणि यावेळी या त्रिकुटाला साथ दिली ती बिनधास्त अशा कीर्तीने. अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' या चित्रपटाला महाराष्ट्रभरात कमालीचा प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला असून बॉक्स ऑफिसवर 'बॉईज ३'ने ४.९६ करोडची तुफान कमाई केली आहे. एकदंरच सध्याचे चित्र पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असे अनेक मजबूत विकेंड मिळण्याची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये 'बॉईज ३'ची भलतीच क्रेझ दिसत असून चित्रपटगृहांमध्ये याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. अगदी सकाळचे शोजही 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत.
चित्रपटाला मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल प्रस्तुतकर्ते आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते म्हणतात, " सध्या आमची 'बॉईज'ची टीम अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे आणि तिथून मिळणारा प्रतिसाद, प्रेम पाहाता चित्रपटाच्या सर्व टीमच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळतेय. 'बॉईज १', 'बॉईज २' ला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आता 'बॉईज ३' ला तिपटीने वाढले आहे. 'बॉईज'ची ही धमाल आता लवकरच चौपट होणार आहे. चित्रपटात 'बॉईज ४' ची घोषणा आम्ही केली असून 'बॉईज ४' लाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळेल, अशी मला खात्री आहे."
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.