मुलगी पसंत आहे’च्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ पुन्हा एकत्र; कल्याणी टिभेची ‘मुलगी पसंत आहे’ मालिका लवकरच सन मराठी वर
‘सासू आणि सून’ ही जोडी जगा वेगळीच असते. त्यांच्यातलं प्रेम कधी फुलेल आणि कधी अचानक तेच प्रेम आटेल याचा कोणी अंदाज घेऊ शकत नाही. आतापर्यंत मालिकांमध्ये सासू आणि सून ही दोन पात्रं वेगवेगळ्या स्वभावानी दाखवण्यात आली. ‘सन मराठी’ वर लवकरच नवीन मालिका सुरु होतेय आणि त्या मालिकेत ही दोन पात्रं थोड्या वेगळ्या पध्दतीने मांडण्यात आली आहेत.
‘सोहळा नात्यांचा’ या ब्रीदवाक्याला धरुन चालणारी ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी वाहिनी’ने ‘मुलगी पसंत आहे’ या त्यांच्या नव्या मालिकेतून सासू आणि सुनेचं नातं थोड्या वेगळ्या पध्दतीने दाखवण्याचं ठरवलं आहे. ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ या दोघांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेत्री कल्याणी टिभे ही देखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते कारण मालिकेचा विषय प्रेक्षकांना आपलासा वाटतो, त्यांना तो आवडतो. एकापेक्षा एक अप्रतिम मालिका ज्यांनी लिहिल्या त्या लेखिका रोहिणी निनावे यांनी ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेची कथा आणि पटकथा लिहिली आहे. संवाद मृणालिनी जावळे यांनी लिहिले आहेत तर सुश्रुत भागवत यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
निलेश मोहरीर यांनी या मालिकेला संगीत दिलं आहे. ही सगळी अप्रतिम टीम एकत्र आल्यामुळे मालिका प्रेक्षकांची मने जिंकणार यात काही शंका नाही.
अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेत ‘सासू’ची भूमिका साकारली आहे तर कल्याणी ‘सूने’च्या भूमिकेत दिसणार आहे. संग्राम समेळ याने मुलाची भूमिका साकारली आहे. चंद्रासारखी तेजस्वी, तिचं बोलणं मधासारखं गोड, मन नदी सारखं निर्मळ अशी ही सून घरी आली खरी पण तिच्या मनात काहीतरी शिजतंय हे नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या प्रोमो मधून प्रेक्षकांच्या लक्षात आलं असणार. पण असं का आणि सासूच्या कोणत्या वागणूकीचा बदला सून घेणार? सासू जितकी सोज्वळ दिसते तशीच ती असेल का? सून कोणत्या हेतून घरात प्रवेश करणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.
कोणाच्या मनात नेमकं काय शिजतंय याचा उलगडा आणि या अनोख्या सासू-सुनेच्या जोडीचा प्रवेश ‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच होणार आहे