नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास
सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी आपला प्रभाव टाकला आहे. यामध्ये अविनाश-विश्वजीत या मराठी सिनेसृष्टीत सध्या गाजत असलेल्या संगीतकार जोडीचाही समावेश आहे. अनेक मराठी चित्रपटांना ‘सुरेल’ करणाऱ्या अविनाश-विश्वजीत या गुणी संगीतकारांच्या या जोडीने आपल्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे.
२०२५ मध्ये अनेक सुमधुर गीतांची भेट या दोघांकडून रसिकांना मिळणार आहे. या संगीतकार जोडीचे अनेक मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे. नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल येत्या शनिवारी २२ फेब्रुवारीला दीनानाथ मंगेशकर रंगमंदिर, विलेपार्ले येथे रात्रौ ८.४५ वा. रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाच्या हेतूनं ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.
‘मुंबई -पुणे-मुंबई’ ह्या चित्रपटापासून अविनाश -विश्वजीत ह्या संगीतकार जोडीची खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींना ओळख झाली. 'कधी तू', 'का कळेना', ‘कधी तु रिमझिम झरणारी बरसात’, 'ओल्या सांजवेळी', 'हृदयात वाजे समथिंग', ‘साथ दे तु मला’ या प्रेमगीतांसोबत असा हा धर्मवीर, ' भेटला विठ्ठल माझा', "खंबीर तु हंबीर तु" 'मदनमंजिरी', 'हे शारदे' या सारखी आज गाजत असलेली गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST