Sunday, March 1, 2026

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली

मेघालय स्पाइस फेस्टिव्हल २०२६ च्या प्रमुख दिवशी मोठी उपस्थिती, सक्रिय व्यापारी संवाद आणि धोरणात्मक चर्चा

मुंबई, १ मार्च २०२६: मुंबईतील मुंबईमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आज पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘मेघालय स्पाइस फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले. या निमित्ताने मेघालय राज्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या सेंद्रिय मसाला अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय स्तरावर भव्य प्रदर्शन घडले. आपल्या ठाम भूमिकेचा प्रत्यय देत शेतकरी, उद्योजक, सहकारी संस्थांचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी अशा १४० सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने मेघालयहून मुंबईत येऊन खरेदीदारांशी थेट संवाद साधला.

उद्घाटनाच्या दिवशी मोठी गर्दी, खरेदीदार-विक्रेता यांच्यात सातत्यपूर्ण संवाद तसेच मसाले आणि पर्यटन क्षेत्रातील संरचित बी२जी (बिजनेस-टू-गव्हर्नमेंट) बैठका पार पडल्या. ‘मेघालयच्या सेंद्रिय मसाला परिसंस्थेतील संधी’ या विषयावरील उच्चस्तरीय मंचाने धोरणात्मक चर्चेला दिशा दिली. प्रत्यक्ष प्रक्रिया प्रात्यक्षिके, चव चाखण्याचे काउंटर आणि विशेष रिटेल प्रदर्शनांमुळे संपूर्ण स्थळ एका सक्रिय बाजारपेठेत रूपांतरित झाले. खरेदी करार, निर्यात चौकशी आणि भागीदारीविषयी चर्चा दिवसभर सुरू राहिल्या, ज्यातून गंभीर व्यावसायिक रस दिसून आला.

मेघालय स्पाइस फेस्टिव्हलचा उद्देश राज्यातील उच्च दर्जाच्या सेंद्रिय मसाल्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पहिल्याच आवृत्तीत मुंबईसह देश-विदेशातील खरेदीदारांचे लक्ष वेधण्यात यश आले आहे. भारताची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईत हा महोत्सव आयोजित करून मेघालय सरकारने आपल्या मसाल्यांना प्रीमियम देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा स्पष्ट प्रयत्न दर्शविला आहे. तसेच या वाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत व्हावा, यासाठी हा महोत्सव राज्यातील शेतकरी आणि मसाला उद्योजकांना राष्ट्रीय किरकोळ विक्रेते, संस्थात्मक खरेदीदार आणि जागतिक निर्यातदारांशी जोडणारे एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून संकल्पित करण्यात आला आहे.

मेघालय सरकारचे मुख्य सचिव डॉ. शकील पी. अहमद, आयएएस यांनी राज्याच्या कृषी पायाभूत व्यवस्थेची प्रामाणिकता अधोरेखित करत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना उत्पादकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण आमच्या उद्योजकांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला तर प्रामाणिकता, निष्ठा आणि दर्जा काय असतो हे जाणवेल.” ते पुढे म्हणाले, “मुळात आमचे शेतकरी निसर्गाचा आदर करतात आणि त्याचे संरक्षण करू इच्छितात; म्हणूनच आमच्याकडे सर्वात स्वच्छ नद्या, स्वच्छ गावे आणि स्वच्छ नेतृत्व आहे.”

मेघालय सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे आयुक्त व सचिव डॉ. विजय कुमार डी., आयएएस यांनी राज्याच्या वाढत्या बाजारपेठीय उपस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की मेघालयची हळद सध्या देशांतर्गत बाजारपेठेसोबतच अमेरिका, मध्यपूर्व आणि युरोपमध्येही पोहोचली आहे, तसेच यंदा आल्याची निर्यात सिंगापूरला करण्यात आली आहे. शाश्वत भागीदारीवर भर देत ते म्हणाले, “आम्हाला शाश्वत शेतीवर विश्वास ठेवणारे खरेदीदार हवे आहेत. आमची उत्पादने योग्य बाजारपेठेत नेऊन शेतकऱ्यांना योग्य दर देणारे भागीदार आम्हाला हवे आहेत.”

सहभागाच्या प्रमाणाचा उल्लेख करत त्यांनी ठामपणे सांगितले, “जगातील सर्वोत्तम हळद आमच्याकडे आहे. आम्ही जिथेही जातो, तिथे हीच कथा सांगतो.” तसेच राज्यातील सर्वात मोठ्या मसाला-प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन येत्या काही महिन्यांत होणार असल्याची माहिती देत त्यांनी मूल्यवर्धन आणि बाजारपेठीय तयारी अधिक बळकट होणार असल्याचे नमूद केले.

उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. शकील पी. अहमद, आयएएस, मुख्य सचिव, मेघालय सरकार; श्री विकास चंद्र रस्तोगी, अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार; डॉ. विजय कुमार डी., आयएएस, आयुक्त व सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, मेघालय सरकार; सौ. एन. भवानी श्री, आयएएस, सचिव, नॅशनल टर्मेरिक बोर्ड; श्री आर. नैणामलई, आयएफएस, सचिव, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, मेघालय सरकार; तसेच श्री बिस्वजीत चक्रवर्ती, सहाय्यक महासचिव, फिक्की यांसह इतर मान्यवर अधिकारी व संबंधित हितधारकांचा समावेश होता.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली

मेघालयने मुंबईतील पहिल्या महोत्सवात भारतातील उदयोन्मुख सेंद्रिय मसाला केंद्र म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली मेघालय स्पाइस फेस्टिव्हल २०२६ ...