Monday, May 18, 2026

*वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव*

 *वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव

*२३ ते २६ मे दरम्यान दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार*

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०व्या) वर्षानिमित्त सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारा भव्य ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २३ ते २६ मे २०२६ दरम्यान हा चार दिवसीय चित्रपट महोत्सव ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह’, वेंगुर्ला येथे रंगणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि आशयघन आठ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. वेंगुर्ल्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या या चित्रपट महोत्सवामुळे चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी संस्कृती, नातेसंबंध, भावना आणि सामाजिक आशय यांचा सुंदर संगम असलेले विविध विषयांवरील चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ याच्या विशेष प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच ‘बटरफ्लाय’, ‘बापल्योक’, ‘गुलकंद’, ‘एप्रिल मे ९९’, ‘फुलवंती, स्थळ आणि ‘द्विधा' यांसारखे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या महोत्सवातून वेंगुर्ल्याच्या मातीतील चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक मधुसूदन कालेलकर, पद्मभूषण मंगेश पाडगावकर आणि कवी आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर)  यांसारख्या महान नामवंतांनी या भूमीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले.  त्यांच्या अजरामर साहित्य आणि गीतांच्या स्मरणाने हा महोत्सव अधिक  संस्मरणीय ठरणार आहे. 

मराठी चित्रपटांचा समृद्ध कलात्मक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, वेंगुर्ला शहराच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवणारा हा उपक्रम ठरणार आहे.

‘वेंगुर्ल्यासारख्या सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या भूमीत प्रथमच आयोजित होत असलेला ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून मराठी कला, साहित्य आणि संस्कृतीचा जागर आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या मातीतल्या कथा, भावना आणि संस्कारांशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. वेंगुर्ल्याच्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासात हा महोत्सव एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरेल, असा विश्वास चित्रपट महोत्सव संचालक ज्येष्ठ लेखक -दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केला.  

वेंगुर्ला नगरपरिषदेला तब्बल १५० वर्षांचा गौरवशाली वारसा लाभला असून तिची स्थापना २५ मे १८७६ रोजी ब्रिटीश काळात झाली. व्यापारी बंदर आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ल्याने शहर विकास, शिक्षण, आरोग्य आणि कला-संस्कृतीच्या जतनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या १५० वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या स्मरणार्थ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चित्रपट महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महोत्सवातील  चित्रपटांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे*

घरत गणपती ( शनिवार दि २३ मे २०२६ दुपारी ४ वा. महोत्सव उद्घाटनाचा चित्रपट)

बापल्योक (शनिवार दि २३ मे २०२६ सायंकाळी ७ वा). 

एप्रिल मे ९९ ( रविवार दिनांक २४ मे, दुपारी ४ वा). 

बटरफ्लाय ( रविवार दिनांक २४ मे, सायंकाळी ७ वा).

फुलवंती ( सोमवार दिनांक २५ मे दुपारी ४ वा).

स्थळ (सोमवार दिनांक २५ मे सायंकाळी ७ वा).

गुलकंद  (मंगळवार दिनांक २६ मे दुपारी ४ वा).

द्विधा (मंगळवार दिनांक २६ मे सायंकाळी ७ वा.  महोत्सव समारोपाचा चित्रपट)




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Sotefin Bharat Limited IPO Opens on Thursday, July 16, 2026

    Sotefin Bharat Limited IPO Opens on Thursday, July 16, 2026 Total Issue Size - Up To 48,00,000 Equity Shares of ₹ 10 each IPO Size - ₹...