Saturday, November 21, 2026

बॉक्स ऑफिसवर ‘आदि अनंत’ची दमदार घोडदौड!*

 *बॉक्स ऑफिसवर ‘आदि अनंत’ची दमदार घोडदौड!*

*पहिल्या आठवड्यात २.१६ कोटींची कमाई*

*१.२५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री!*

हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा सुरू असतानाही पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने तब्बल २.१६ कोटी रुपयांची कमाई केली असून महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री केली आहे. ही विक्रमी घोडदौड अद्याप सुरूच आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता चित्रपटाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पाच मराठी चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांत २५० हून अधिक शोसह चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक बंध, त्यांच्यातील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांसाठी असलेली ओढ या सगळ्याची हृदयस्पर्शी मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, त्यांच्यातील सुंदर केमिस्ट्री आणि भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. केवळ मनोरंजन न करता नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा अनुभवायला देत आहे.

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “प्रेक्षकांनी ‘आदि अनंत’ला दिलेला प्रतिसाद मनापासून आनंद देणारा आहे. नात्यांमधील भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि ते चित्रपटाशी जोडले जात आहेत, हीच आमच्यासाठी मोठी पावती आहे.”

निर्माते समीर हंपी म्हणतात, “पहिल्या आठवड्यात मिळालेलं हे यश आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाची घोडदौड सुरू असून दुसऱ्या आठवड्यातही २०० चित्रपटगृहांत आणि २५० हून अधिक शोसह चित्रपट प्रदर्शित होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम असेच कायम राहील, अशी आशा आहे.”

निर्माते मुरलीधर छतवानी म्हणतात, “मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच प्रोत्साहन देणारा असतो. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून समाधान वाटते. पहिल्या आठवड्यातील यश आणि दुसऱ्या आठवड्यातही मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास आहे.”

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित*

  ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित* क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम च्या भव्य यशानंतर, झिम्मा’ आणि ...