मृणाल कुलकर्णीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित;
पुष्की, प्रार्थना,
सोनाली यांचे इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल
मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आणि खास प्रेक्षकांसाठी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे.
पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. ‘ती’ कोण? आणि मग ‘ती’ कोणाची आहे? अशाप्रकारे पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मिळालीच असतील. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. अशीच गोष्ट आहे अनयची (पुष्कर जोग) आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुली म्हणजे सई आणि प्रियांका. प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकेची हिंट मिळाल्यामुळे या प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमध्ये त्यांची नेक्स्ट स्टेप काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता देखील नक्की वाढणार. या ट्रेलरमधून एक सरप्राईज प्रेक्षकांना मिळालं आणि ते म्हणजे सिध्दार्थ चांदेकर या सिनेमात छोटीशी भूमिका साकारतोय.
या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. सिनेमाचे चित्रीकरण इतके सुरेख, सुंदर झाले आहे की पाहता क्षणीच प्रेक्षक नक्कीच सिनेमाच्या प्रेमात पडतील आणि याचे श्रेय मृणाल यांना जाते. बॅकग्राऊंड म्युझिक, गाणं या गोष्टी देखील कुतुहल वाढवत आहेत. ही एक हलकी-फुलकी, रोमँटिक कॉमेडी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे असून आताची जनरेशन या सिनेमाचा पुरेपूर आनंद लुटतील याचा अंदाज या इंटरेस्टिंग ट्रेलरवरुन बांधता येऊ शकतो.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. राहुल हकसर हे या सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर आहेत तर हा सिनेमा रजत एंटरप्राईझ नेशनवाईड रिलीझ करणार आहेत.
भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.








