अभिनेत्री पल्लवी पाटीलचे नवे फोटोशूट, स्वत: डिझाइन केलेल्या स्टाइलिश कपड्यांमध्ये केले फोटोशूट
‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ह्या फोटोशूटमधून तिचा इंडो-वेस्टर्न लूक तिच्या चाहत्यांसमोर रिविल झाला आहे. ह्या फोटोशूटचे वैशिष्ठ्य म्हणजे, ह्यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाइन केलेले आहेत. आणि ते तिच्या आईच्या साड्यांचे बनलेले आहेत.
साड्यांचे ड्रेस डिझाइन करण्याच्या आपल्या आवडीविषयी सांगताना पल्लवी पाटील म्हणते, “माझ्या आईच्या अनेक आठवणी तिच्या साड्यांशी निगडीत आहेत. आणि त्यामूळेच तिला तिच्या साड्या जुन्या झाल्यावर टाकायला भावनिकदृष्ट्या किती कठीण जाते, हे मी लहानपणापासून पाहत आलीय. तिच्या साखरपुड्यापासून ते आजवरच्या अनेक घरगुती सण-समारंभांपर्यंतच्या साड्या ती किती जपून ठेवते, हे पाहिल्यामूळेच ही नामी शक्कल डोक्यात आली की, आईच्या साड्यांचे ड्रेस बनवले तर स्टाइल, फॅशन, भावना ह्या सगळ्याचीच जपणूक होईल.“
पल्लवी पाटीलने फॅशन डिझाइनिंगचे कोणतेही तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही तिच्या डिझाइन्सना तिच्या मैत्रीणी आणि जवळच्या लोकांची पसंती मिळते. पल्लवी सांगते, “इतर कोणाहीपेक्षा आपल्याला आपल्या शरीराची ठेवण आणि आवड ह्याची जास्त जाण असते. त्यामूळे मला काय साजेसे दिसेल, कोणत्या रंगसंगतीत मी उठून दिसते, कोणते मटेरिअल मला चांगले वाटेल, हे माहित असल्याने साडीचे ड्रेस शिवताना मला माझ्या कम्फर्टप्रमाणे कपडे शिवता येतात. तुम्ही कशा प्रकारची स्टाइल कॅरी करू शकता ह्यावरून तुमची पर्सनॅलिटी कळते, असं मला वाटतं. “
ती पूढे म्हणते, “अवॉर्ड फंक्शन्सच्या रेड कार्पेटवरही मला आता साड्यांचे डिझाइनर ड्रेस घातल्यावर चाहत्यांकडून आणि विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या डिझाइनर्सकडून माझ्या ह्या कलेसाठी कॉम्प्लिमेन्ट मिळायला लागल्या आहेत, त्यामूळे तर आता साड्यांचे ड्रेस बनवायची कला जोपासायचा अजून हुरूप आला आहे. ''