सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार ?
‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला
प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘ मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही ५ अॅागस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे व विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहयला मिळणार आहे. वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ या बेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक स्वरूपात यात दाखवण्यात आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ हा वेबसीरिज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.’’
प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली असून या वेबसीरिज मध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.