सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कलाकार यंदा धडाक्यात आणि अधिक उत्साहाने साजरा करणार रक्षाबंधन!
भावंडे म्हणजे मस्ती, खोड्या, चेष्टा-मस्करी आणि अगदी मारामारीसुद्धा! पण ती लोहचुंबकासारखी असतात, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहूच शकत नाहीत. भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नाते साजरे करण्याचा सण म्हणजे, रक्षाबंधन. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कलाकार आपल्या भावंडांच्या गोड आठवणी आणि यावर्षी राखीपौर्णिमेचा सण साजरा करण्याचे आपले प्लॅन्स उत्साहाने सांगत आहेत.
बडे अच्छे लगते हैं 2 मालिकेत नंदिनी कपूरची भूमिका करणारी शुभावी चोक्सी म्हणते, “राखी पौर्णिमा हा असा सण असतो, जेव्हा सगळे कुटुंबीय एकत्र होऊन आनंदाने हा सण साजरा करतात. माझा धाकटा भाऊ शुभेन्द्र आणि त्याचा खास मित्र आनंद (जो माझ्या दुसर्या एका आईचा मुलगा आहे) माझ्या घरी जेवायला येतात. मी त्यांना राखी बांधते. लहान असताना माझे शुभेन्द्रशी खूप भांडण व्हायचे. पण, तो इतका गोड आहे की, तो नुसता हसायचा. मी नेहमी त्याच्या ताटातून जेवायचे, त्याच्या ताटातली मिठाई उडवायचे. आता मागे वळून बघते तेव्हा माझ्या या खोडीचे मलाच हसू येते. खरं सांगायचं तर, जसजशी वर्षं उलटली, तसा या उत्सवाचा आनंद तसाच राहिला पण आमच्यातील भाऊ-बहिणीचे नाते मात्र आणखी दृढ होत गेले. आमच्या कामाच्या व्यापामुळे मी भावाला वरचे वर भेटू शकत नाही, पण माझ्या मनात ही खात्री असते की मला एखादा सल्ला हवा असेल, किंवा आधार हवा असेल, तर तो नेहमी माझ्या सोबत असेल. तो माझा फक्त भाऊ नाही, तर प्रसंगी वडिलांसारखा आधारस्तंभ देखील बनतो. आम्ही आपापल्या जीवनात कितीही गुंतलेले असलो, तरी या मंगल दिवशी आम्ही आवर्जून भेटतो.”
‘अपनापन... बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत पल्लवीची भूमिका करणारी राजश्री ठाकूर म्हणते, “दर वर्षी मी माझ्या परिवारासह रक्षाबंधन सण साजरा करते. आमचे संयुक्त कुटुंब आहे. मला दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक सख्खा आणि एक चुलत भाऊ आहे. माझ्या लहानपणापासून हा सण आमच्याकडे खूप थाटात साजरा होत आहे. सगळे जण माझ्या मोठ्या भावाच्या घरी जमतात. त्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असल्याने आमच्याकडे नित्यनेमाने नारळी भाताचा भेत असतो. दर वर्षी मी स्वतः नारळ आणि भाताचा हा गोड पदार्थ स्वतः रांधते. हा एक मस्त कार्यक्रम असतो आणि आम्ही तो थाटामाटात साजरा करतो. यावर्षीही त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत आहे.”
‘अपनापन... बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत बरखाची भूमिका करणारी श्रद्धा त्रिपाठी म्हणते, “रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या गोड नात्याचा सण. त्यांच्यात जिवाभावाचे मैत्र असते, ते एकमेकांच्या पापाचे वाटेकरी असतात आणि एकमेकांची गुपितेही ते जपतात. भाऊ-बहिणीच्या नात्यातील मैत्री म्हणजे जणू त्या दोघांच्या हृदयाला जोडणारे सप्तरंगी इंद्रधनुष्यच! भावना, प्रेम, काळजी, आदर, आनंद, गुपिते आणि मस्तीचे हे सात रंग! माझे आणि माझ्या भावाचे नातेही असेच आहे. आमच्यात भांडणं तर होतातच पण दोन-तीन दिवसात ती मिटतात देखील. रक्षाबंधन सणाचा आनंद मात्र आम्ही भरपूर लुटतो. भाऊ असल्याची वेगळीच मजा असते, असे मला वाटते. तुम्हाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला भावाच्या नजरेतून बघायला आणि अनुभवायला मिळतात. सगळे भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षेविषयी फार जागरूक असतात. माझा भाऊ परदेशी राहात असल्याने आम्हाला एकमेकांची सोबत फारशी मिळत नाही. आता पडद्यावर मला एक नवे कुटुंब मिळाले असल्याने माझा सख्खा भाऊ न भेटल्याची खंत थोडी कमी होते. पडद्यावरचा माझा भाऊ, विशेषतः अनमोल हा अगदी माझ्या भावासारखा आहे. आम्ही भांडतो, हसतो आणि एकमेकांच्या खोड्या काढतो. गौतम आणि अनमोलच्या रूपाने मला दोन नवीन भाऊच भेटले आहेत!”
सुपरस्टार सिंगर 2 चा स्पर्धक आणि छोटा शेफ प्रत्युष आनंद म्हणतो, “सायली दीदीसारखी कॅप्टन मला दिल्याबद्दल मी या शोचा ऋणी आहे. या मंचावर मी पाऊल टाकले तेव्हापासून सायली दीदी माझ्यासोबत आहे आणि माझी काळजी घेत आहे. ती नेहमी मला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असते. मी तिचा खरोखर ऋणी आहे. आम्ही कधी कधी एकत्र जेवतो, गाणी ऐकतो, रियाज करतो आणि एकत्र वेळ घालवतो. ती माझे प्रेरणास्थान आहे आणि मी तिच्याकडून बरेच काही शिकलो आहे. मी तिला इतकेच सांगू इच्छितो की, तिने आजवर माझी काळजी घेतली आहे, तसाच मीही भविष्यात नेहमीच माझ्या सायली दीदीची काळजी घेईन. राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”