Saturday, February 15, 2025

नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

 नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य सिनेमांनी रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. यात अनेक  प्रतिभावान संगीतकारांनी तसेच संगीतकारांच्या जोड्यांनी  आपला प्रभाव टाकला आहे. यामध्ये अविनाश-विश्वजीत या  मराठी सिनेसृष्टीत सध्या गाजत असलेल्या संगीतकार जोडीचाही समावेश आहे. अनेक मराठी चित्रपटांना ‘सुरेल’ करणाऱ्या अविनाश-विश्वजीत या गुणी संगीतकारांच्या या जोडीने आपल्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. 



२०२५ मध्ये अनेक सुमधुर गीतांची भेट या दोघांकडून रसिकांना मिळणार आहे. या संगीतकार जोडीचे अनेक मराठी चित्रपट आपल्या भेटीला  येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे. नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल येत्या शनिवारी २२ फेब्रुवारीला दीनानाथ मंगेशकर रंगमंदिर, विलेपार्ले येथे रात्रौ ८.४५ वा.  रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाच्या हेतूनं  ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.  

‘मुंबई -पुणे-मुंबई’ ह्या चित्रपटापासून अविनाश -विश्वजीत ह्या संगीतकार जोडीची खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींना ओळख झाली. 'कधी तू', 'का कळेना', ‘कधी तु रिमझिम झरणारी बरसात’, 'ओल्या सांजवेळी', 'हृदयात वाजे समथिंग', ‘साथ दे तु मला’ या प्रेमगीतांसोबत असा हा धर्मवीर, ' भेटला विठ्ठल माझा', "खंबीर तु हंबीर तु"  'मदनमंजिरी', 'हे शारदे' या सारखी आज गाजत असलेली गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.

शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे यांच्यासह स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्याही प्रमुख भूमिका

 १६ मे रोजी घडणार 'बंजारा'ची सफर 

मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणाऱ्या 'बंजारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या १६ मे रोजी हा चित्रपट सिक्कीमची सफर घडवतानाच मैत्रीचीही अनोखी सफर घडवणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि  मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे याने केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्नेह, सक्षम आणि आदित्य हे तीन मित्र प्रवासाला निघालेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाबद्दची उत्सुकता, आत्मविश्वास झळकत आहे. पोस्टरमधून 'बंजारा' हा केवळ साहसी प्रवास नसून तो भावनिक आणि मानसिक पातळीवर बदल घडवणारा, स्वतःचे स्वप्न जगण्याची प्रेरणा देणारा प्रवास असल्याचे अधोरेखित होतेय. या तीन मित्रांचा हा प्रवास त्यांच्या मैत्रीला एक अनोखी दिशा देणारा असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांसाठीही 'बंजारा' हा एक अद्भुत अनुभव ठरणार आहे. 

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात," ही खरंतर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्नेह दिग्दर्शनात पदार्पण करत असून अभिनयही करत आहे आणि त्याच्या या चित्रपटाची निर्मिती करण्याची संधी मला मिळत आहे. यापेक्षा आनंददायी काय असू शकते. यानिमित्ताने भरत आणि सुनील या माझ्या मित्रांसोबत बऱ्याच काळाने मला एकत्र कामही करता आले. मुलगा म्हणून नाही परंतु स्नेहने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात दडलेल्या स्वप्नांचा शोध घेणारा असून  प्रवासप्रेमी, साहसी व्यक्ती आणि निखळ मैत्री अनुभवणाऱ्या प्रेक्षकांसाठी  'बंजारा' एक खास भेट ठरणार आहे. 

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, "यापूर्वी मी सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 'बंजारा'च्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. यासाठी मी बाबा, सुनील बर्वे आणि भरत जाधव यांचे विशेष आभार मानेन. कारण त्यांचा अनुभव आणि सहकार्य मला चित्रपटासाठी लाभले आहे. माझ्या या प्रवासात मला त्यांची खूप मदत झाली. तसेच माझे सहकलाकार सक्षम आणि आदित्य यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. मुळात आमचा वयोगट सारखा असल्याने हा चित्रपट आम्हाला जगता आला. आम्ही ही केमिस्ट्री प्रेक्षकांना पडल्यावर दिसेलच.''

सावनी रवींद्रच्या मधुर आवाजासोबत तिच्या अभिनयाचीही चर्चा – ‘मनमोही’ची जादू!



 

‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू, अभिजित खांडकेकरसोबत मनमोहक केमिस्ट्री!

सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या व्हॅलेंटाईन वीक दरम्यान अनेक नवनवीन प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच सर्वांची लाडकी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिच्या सुद्धा एका सुंदर अशा गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सावनीने आजवर अनेक भाषांमध्ये गायन केले आहे.तसेच मराठी आणि इतर भाषिक चित्रपटांसाठी अनेक सुमधूर गाणी गायली आहेत.

आणि आता तिने तिच्या फॅन्स साठी valentine's days च्या निमित्ताने "मनमोही" या गाण्याची भेट दिली आहे. यामधे फक्त गाण्यावरच ती न थांबता तिने या गाण्यात अभिनयसुद्धा केला असल्याचं पाहायला मिळतंय. 'मनमोही' असे या गाण्याचे नाव असून या गाण्यात सावनी रविंद्र सह सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तसेच लोकप्रिय बालकलाकार केया इंगळे हिने साकारलेली भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. "मनमोही" चं सुंदर संगीत प्रणव हरिदास याचे असून वलय मुळगुंद याचे शब्द मनाला भावणारे आहेत. सावनी बरोबर या गाण्यात सुप्रसिद्ध गायक अभय जोधपुरकर याच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते.  'मनमोही' या गाण्याची कथाही आशयघन असल्याचे पाहायला मिळते. एक मोडलेला संसार जेव्हा दुसरा व्यक्ती येऊन सावरतो आणि त्या कुटुंबाला आधार देतो याचं वर्णन या गाण्यातून करण्यात आलं आहे.

गाण्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली, "या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा पाहून खूप छान वाटतंय. सावनी ओरिजनल चं हे पहिलं असं मराठी गाणं आहे ज्यात मी गायन आणि अभिनयाच्या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. आजवर 'सावनी ओरिजनल'मध्ये मी तामिळ, तेलगू, मल्याळम,बंगाली, गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली होती पण आज मी पण मराठी गाण्यातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या गाण्यात काम करण्याचा आनंद खूपच चांगला होता. गाणं गाताना मजा आली त्याहून जास्त गाणं शूट करताना आली. या गाण्यात माझा सहकलाकार अभिजीत खांडेकर आहे. अभिजीत माझा चांगला मित्र असून बरेच दिवसांपासून आम्हाला एकत्र काहीतरी काम करायचं होतं आणि तो योग या 'मनमोही' गाण्यानिमित्त जुळून आलाय. यंदाच्या लग्नसराईमध्ये हे गाणं धुमाकूळ घालेल यात शंका नाही".

प्राजक्ताचा वेगळा अंदाज

 प्राजक्ताचा वेगळा अंदाज

अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती  रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे  पण त्याचवेळी ती  गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारत आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.  

‘कसलेल्या विनोदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी हे माझ्यासाठी खूप खास होतं. माझ्या आजवरच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून 'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील’ असा विश्वास प्राजक्ता व्यक्त करते.  प्राजक्ता माळी सोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.  

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीची भव्य निर्मिती ‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर

 श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीची भव्य निर्मिती   ‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर

महाराष्ट्राचा गौरवशाली 'शिवइतिहास' घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने ! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी! ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे.  

युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होणार आहे. चंद्रकांत सावंत हे  या नाटकाचे  मार्गदर्शक तर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे रणरागिणी ताराराणी नाट्यनिर्मितीचे संकल्पक आहेत.   

“ताराराणींचा इतिहास हा जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला देदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा; या उद्देशाने आम्ही या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे," असे सरस्वती एज्युकेशन सोसायटी व श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या रणरागिणी ताराराणी या नाटकात ५० कलाकारांची फ़ौज असणार आहे.

“नाटकात काम करायचं, या डेडिकेशनने नाटकातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. रंगमंचावर या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा देखणा प्रयोग पहायला मिळणार आहे. जो रसिकांना वेगळा आनंद देईल," असा विश्वास दिग्दर्शक विजय राणे यांनी व्यक्त केला.  “ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल," असा विश्वास लेखक युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तनीषा वर्दे (ताराराणी), कृष्णा राजशेखर (येसूबाई), सिद्धी घैसास (जानकी), चेतन म्हस्के (शंभूराजे), अरुण पंदरकर (राजाराम), उमेश ठाकूर (संताजी/रामाजी/ मिरखान), ऋषिकेश जोशी (धनाजी), सुनील गोडसे (औरंगजेब), मोहिका गद्रे (चेन्नमा/झीनत), मुकुल देशमुख (जुल्फीकार) आदि कलाकारांच्या रणरागिणी ताराराणी या नाटकात भूमिका आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटी निर्मित,अद्वैत थिएटर्स प्रकाशित रणरागिणी ताराराणी नाटकाचे व्यवस्थापन हरी पाटणकर सांभाळत आहेत.  श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) मुंबई ही संस्था गेली ८२ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य अशा  विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या  शिवजयंतीला  रणरागिणी ताराराणी या नाटकाच्या  शुभारंभाचा प्रयोग  श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, येथे दुपारी ३.३० वा. रंगणार आहे.

दुबईमधील नयनरम्य ठिकाणी झाले चित्रीकरण ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रदर्शित

 ‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल 

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येत असतो. अशाच एका संवेदनशील विषयावर  भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढवली असतानाच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपटातील 'ओ बावरी' हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या प्रेमगीताला सोनू निगम यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. तर रोहन- रोहन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. 

गाण्यातून मनातील भावना व्यक्त होत असतानाच या गाण्यातील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखावणारे आहे. दुबईमधील प्रसिद्ध आणि नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण झाले असून फुलांनी सजलेले मिरॅकल गार्डन असो किंवा दुबईचे प्रसिद्ध डेझर्ट असो. दुबईच्या भव्य आणि रमणीय ठिकाणी पार पडलेल्या चित्रीकरणामुळे या गाण्याला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली आहे. पुष्कर जोग आणि हेमल इंगळे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना यात पाहायला मिळतेय.  “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या  प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, " ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट वैवाहिक नातेसंबंधांवर आधारित आहे. जिथे तुम्हाला प्रेम, विश्वास, संवाद आणि मानवी भावना यांचा हृदयस्पर्शी प्रवास पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक विशेष स्थान आहे आणि 'ओ बावरी' हे गाणं त्या अनोख्या भावनेचे  दर्शन घडवते. गाण्याचे चित्रीकरण दुबईमध्ये झाले असून हा खूप वेगळा अनुभव होता. मला विश्वास आहे की, हे गाणे प्रेक्षकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही हे गाणे प्रेमीयुगुलांच्या भेटीला आणले आहे.  प्रत्येक कपलला हे गाणं नॅास्टेल्जिक बनवेल. जुन्या दिवसांची आठवण करून देईल किंवा ज्यांना आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांना हे गाणं नक्कीच मदत करू शकेल.’’ 

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंटल यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम!

 प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने चित्रपटप्रेमींना एक खास भेट दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंटकडून सर्व चित्रपटप्रेमींसाठी व्हॅलेंटाईनची ही खास भेट ठरली आहे. ‘ मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत. 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल.

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल.” दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डेच्या वातावरणात ‘प्रेमाची गोष्ट २’ ची अनोखी पहिली झलक म्हणजे आमच्याकडून प्रेक्षकांना एक विशेष रोमँटिक भेट आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून २०२५ मध्ये अनुभवायला मिळेल.

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...