५ गुण ज्यांच्यामुळे अभिनेता आरोह वेलणकर ठरेल बिग बॉस मराठी सिजन २चा विजेता!
५ गुण ज्यांच्यामुळे अभिनेता आरो ह वेलणकर ठरेल बिग बॉस मराठी सिजन २चा विजेता!
बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यावर आले आहे. टॉप ६ स्पर्धकांमधून कोण विजेता ठरेल ह्याविषयी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री करूनही प्रेक्षकांची मनं जिंकून ग्रँड फिनालेला ‘रेगे’ फेम आरोह वेलणकर पोहचला आहे. आरोहमधल्या खालील पाच गुणांमूळे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.
१. खिलाडूवृत्ती – वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बिग बॉस मराठीचे सगळे टास्क बेधडकपणे खेळतो. खेळत असताना समोरची व्यक्ती हि केवळ त्याच्यासाठी प्रतिस्पर्धी असते. भावना बाजूला ठेऊन केवळ टास्क जिंकण्याकडे त्याचे लक्ष असते. टास्क खेळताना त्याने कधीच बळाचा वापर केला नाही. प्रत्येक टास्क तो बुद्धिचातुर्याने खेळतो. नियमांचा भंग त्याच्याकडून कधीच होत नाही. सलमान खान आला असताना महेश मांजरेकर सुद्धा म्हणाले होते कि, “आरोह नियमांना धरून खेळणारा स्पर्धक आहे.” गेल्याच आठवड्यात त्याला बेस्ट परफॉर्मरचा किताबही मिळाला होता.
२. स्पष्टवक्तेपणा – २० जुलैला बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून आरोह आपली मते नि:संकोचपणे व्यक्त करताना दिसला आहे. प्रेक्षक, सह-सदस्य, आणि माजी सदस्य या सगळ्यांच्या मते आरोह मुद्देसूद बोलतो. सगळ्यांनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाची वाहवाही केली आहे. सोशल मिडीयावर कमेंट्समध्ये चाहत्यांनी त्याच्या या गुणाची प्रशंसा केली आहे. तिकीट टू फिनाले टास्क दरम्यान आलेल्या सगळ्या जुन्या स्पर्धकांनी त्याच्या खेळाची आणि स्वभावाची स्तुतीच केली होती. पाठीमागे न बोलता समोरासमोर शांत आणि स्पष्टपणे मते व्यक्त करणारा आरोह सगळ्यांचा आवडता आहे.
३. सर्वसमावेशक – बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यापासून आरोहने घरातल्या प्रत्येक सदस्यासह खास ऋणानुबंध जोडले. घरातल्या सर्व सदस्यांचे त्याच्याविषयी चांगले मत आहे. पहिल्या आठवड्यापासून आरोह मनमिळावू, सर्वसमावेशक असल्याची मते सगळ्यांकडून व्यक्त केली जात होती. कायम वेगवेगळे किस्से आणि कहाण्या सांगून तो सदस्यांना एकत्र आणायचा, हे अनसीन-अनकटमधल्या व्हिडीयोजमधून स्पष्ट होत आहे. शिव ठाकरे, अभिजित केळकर या दोघांबरोबर त्याचे खटके उडाले असताना आरोहने समोरून त्यांची माफी मागितली होती. घरातल्या सदस्यांबरोबर कमीत कमी वाद होतील यासाठी कित्येकदा न सांगता त्याने इतरांची कामे केली आहेत. घरात कायम शांत वातावरण राहील यासाठी तो काळजी घेत आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मनमिळावू, सर्वसमावेशक वृत्ती असलेला हा एकमेव सदस्य असू शकेल.
४. तत्पर वृत्ती – बिग बॉसच्या घरात सगळे सदस्य समान असतात. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला सदस्यांना कामाचे वाटप केले जाते. आरोहने त्याच्या वाटणीची सगळी कामे कायम तत्परतेने पूर्ण केली आहेत. कुठल्याही कामासाठी त्याने नाही म्हटले नाही. प्रत्येक काम तो मन लावून करत आला आहे. कामाबाबतीत तो कधीच तक्रारीला वाव ठेवत नाही. त्याने बऱ्याचदा इतर सदस्यांची सुद्धा कामे केली आहेत स्वतःच्या वाटणीची कामे झालेली असतानाही. इतरांची कामे करून सुद्धा त्याने त्याची वाच्यता कधी केली नाही. बिग बॉसच्या घरात असेच सदस्य सगळ्यांना हवेहवेसे वाटतात जे आपल्या कामाप्रती तप्तर असतात.
५. सामाजिक भान जपणारा – बिग बॉस मराठीच्या अनेक अनसीन अनदेखाच्या भागांमध्ये आरोह विविध सामाजिक प्रश्नांविषयी आपली मते व्यक्त करताना दिसला आहे. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या होत्या. तो अनेक एनजीओजसाठी काम करतो. ‘माय होम इंडिया’, ‘नुतन गुळगुळे फाउंडेशन’ अश्या अनेक सामाजिक संस्थांशी तो संलग्न आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तो कायम समाजोपयोगी कामांना वेळ देत आला आहे. नुकतंच त्याने ध्वनी प्रदूषण करणे कसे चुकीचे आहे, ते कसे टाळले पाहिजे याविषयी अनसीन अनदेखामधल्या एका व्हिडीयोमध्ये सांगतले होते. आरोह हा अतिशय जागरूक स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात आरोहने वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी सदस्यांना विचार मांडायला प्रवृत्त केले आहे.
बिग बॉस मराठी या रिऍलिटी शो मध्ये स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येतात. स्पर्धक खऱ्या आयुष्यात कसे आहेत याची झलक प्रेक्षकांना मिळते. सूत्रांच्या अनुसार, आरोहने कधीच कुठला मुखवटा धारण केला नाही. बिग बॉसमध्ये तो जसा आहे तसाच कायम वागत आला. आरोह खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप मेहनती, समंजस,स्पष्टवक्ता आहे. स्पर्धक म्हणून हे सगळे स्वभावगुण पाहता बिग बॉस मराठीच्या विजेतेपदासाठी आरोह वेलणकरचेच नाणे खणखणीत वाजेल असे वाटते. त्यामुळेच आरोह वेलणकर बिग बॉस मराठी सीजन २च्या ट्रॉफीवर हक्क गाजवताना कदाचित दिसू शकेल.