सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार...
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील 'नकारघंटा' हे गंमतीशीर गाणं प्रदर्शित
शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील एक धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज पटवर्धन लिखित 'नकारघंटा...' असे बोल असलेलं हे गाणं सुबोध भावेवर चित्रित करण्यात आलं असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं अधिकच रंगत आणली आहे.
'हळूच मनाचं दार उघडून, रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा... नकारघंटा...' या ओळींमधूनच साधारण कल्पना प्रेक्षकांना आली असेलच. विवाहेच्छुक सुबोध भावे लग्नासाठी मुली बघताना दिसत असून अपेक्षांमध्ये न बसल्याने त्याला बहुतेक स्थळांकडून नकारच मिळत असल्याचं या गाण्यातून दिसतंय. सुबोधच्या आयुष्यातील ही नकारघंटा थांबून, तो बोहल्यावर चढणार का? हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे निर्माते आहेत.
गाण्याबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, '' चित्रपटाची कथा पुढे नेणारं हे एक मजेदार गाणं आहे. वय वाढलं की लग्न जमवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि अशातही एखादी मनासारखी मुलगी मिळालीच तर तिच्या अपेक्षांच्या यादीत बसणं, हे त्याहूनही मोठं आव्हान असतं. मग अशा वेळी पचवावा लागतो, तो नकार... हेच गंमतीशीररित्या या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याचे बोल, संगीत आणि आदर्श शिंदे यांचा जबरदस्त आवाज हे सगळंच खूप छान जुळून आलं आहे.''
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST