Tuesday, December 17, 2024

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

 'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स आॅसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा रंगतदार टिझर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील ‘इलू इलू’ या रोमँटिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली.

२०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण हि व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल. 

मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, ‘मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर 'इलू इलू' च्या निमित्तानं मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तीरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्यानं होकार दिल्याचंही एली म्हणाली’. मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत.  

एलीसोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ, वनिता खरात, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, निशांत भावसार, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. 

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

‘इलू इलू’ ३१ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO

  Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO Riding h...