सौर ऊर्जेमध्ये महिला सक्षमीकरण टाटा पॉवरचे स्किल डेव्हलपमेंट
शहाडमधील इन्स्टिट्यूटमध्ये सौर ऊर्जेसंदर्भात ४५० महिलांना प्रशिक्षित केले
ठाणे, ४ मार्च २०२३: टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख केंद्र टीपीएसडीआय-शहाड इलेक्ट्रिकल व हरित ऊर्जासंदर्भातील अत्यावश्यक कौशल्ये प्रदान करून महिलांना सक्षम करत आहे. एप्रिल २०२२ पासून टीपीएसडीआय-शहाडमध्ये ४५० पेक्षा जास्त महिला प्रशिक्षणार्थींना होम ऑटोमेशन, सोलर पीव्ही सिस्टिम, पॉवर सिस्टिम आणि डिस्ट्रिब्युशन कौशल्यांचे प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे. जानेवारी २०२३ मध्ये टीपीएसडीआय-शहाडने महिलांसाठी एक विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरु केला, यामध्ये ‘आभा’ (फक्त महिला) बॅचेसमध्ये २७० विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे, अंबरनाथ, भायखळा, शेगाव इंजिनीयरिंग कॉलेज, एआरएमआयटी सीओई आणि जोंधळे पॉलिटेक्निक अंबरनाथ यासारख्या स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून या विद्यार्थिनी आलेल्या होत्या.
फेब्रुवारी २०२३ मध्ये याच बॅचमध्ये श्रीमती मंजुश्री इंगोले आणि त्यांची कन्या कुमारी माधवी इंगोले या दोघी मायलेकींनी एकत्र प्रशिक्षण घेतले. सर्वांसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. आर्थिक अडचणींमुळे श्रीमती मंजुश्री यांना शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते, पण त्यांनी त्यांच्या मुलीला मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, तिला ठाण्यातील मुलींच्या आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये दाखल केले. टीपीएसडीआय-शहाडमध्ये या मायलेकींनी सोलर पीव्ही सिस्टिम आणि होम ऑटोमेशन व डिस्ट्रिब्युशन कौशल्यांचे प्रशिक्षण एकत्र घेतले. टाटा पॉवरचे सीएचआरओ श्री. हिमल तिवारी यांनी त्यांचा सत्कार केला.
श्री. सतीश महाजन, प्रिन्सिपल, टीपीएसडीआय-शहाड यांनी सांगितले, "जीवनात प्रगती घडवून आणण्यासाठी आणि कामामध्ये योगदान देण्यासाठी आवश्यक कौशल्ये व प्रशिक्षण महिलांना प्रदान केले जात असल्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. महिलांसाठीच्या आमच्या विशेष प्रशिक्षण उपक्रमांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. महिलांच्या कौशल्य विकासाला हातभार लावण्याचे हे काम भविष्यात देखील सुरु ठेवण्याची आमची योजना आहे."
टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची सुरुवात २०१५ साली करण्यात आली. युवकांना तसेच इतरांना देखील नोकरी, उद्योग, रोजगारासाठी उपयुक्त ठरतील, खासकरून वीज व पूरक क्षेत्रांशी संबंधित कौशल्ये प्रदान करून सक्षम बनवावे, भारतीय ऊर्जा क्षेत्रामध्ये असलेल्या कौशल्य कमतरता भरून काढल्या जाव्यात यासाठी टाटा पॉवर कंपनीने हा उपक्रम सुरु केला.