Friday, August 16, 2024

‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले

‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले

आपल्या देशात भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांची योग्य दखल घेतली जात नाही - राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत

'ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे ऊर्फ भाऊ’ यांनी साकारलेली शिल्प पाहत आम्ही मोठे झालो. भारतामध्ये अनेक शिल्पकार, चित्रकार आहेत ज्यांचा देश चुकलेला आहे. कारण हे कलावंत जर विदेशात असते, तर त्यांचा खूप मोठा सन्मान झाला असता.', असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले.  सदाशिव साठे स्मृती संग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या तर्फे ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे यांचे आत्मकथन असलेले ‘हा ध्यास जीवनाचा’ या  पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नेहरू सेंटर, वरळी येथे राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर चित्रकार व कला अभ्यासक सुहास बहुळकर, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रवी जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, 'ग्रंथाली'चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि या पुस्तकाचे सहलेखन आणि शब्दांकन केलेले सतीश कान्हेरे हे मान्यवर उपस्थित होते.



'भाऊंच्या पुस्तकाचे सहलेखन मला करता आले, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे', अशा शब्दात लेखक सतीश कान्हेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर पुढच्या वर्षी भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय त्या निमित्ताने तरी सरकारने भाऊंच्या महान कार्याची दखल घ्यावी जेणेकरून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल, अशी इच्छा  ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी यावेळी बोलून दाखवली.

'संकल्पनात्मक शिल्प आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व शिल्पामध्ये मांडणं हे भाऊंचे वैशिष्ट्य होते.  अशी पुस्तकं कला विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात यावी', अशी सूचना चित्रकार व कला अभ्यासक सुहास बहुळकर यांनी यावेळी केली. तर निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, “डोंबिवलीत केमिकलच्या कारखान्याबरोबरंच भाऊंच्या शिल्पांचे सुंदर सरोवर आहे. पुस्तक वाचल्यानंतर या  कलादालनाला प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी. शिल्पांकडे कसे पहावे याची वेगळी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.”



या कार्यक्रमात जेव्हा 'तुमच्या शब्दाला वजन असल्याने तुम्हीच सरकार दरबारात शब्द टाकून भाऊंच्या कामाची दखल घ्यायला सांगा' असे जेव्हा  राज ठाकरे यांना सांगण्यात आले. तेव्हा   'पुतळ्यांबद्दल पुतळयांशी काय बोलायचं?  जे करायचं ते आपण एकत्र येऊन करू. किंवा माझ्या हातात सत्ता देऊन दोन्ही अपेक्षा माझ्याकडून करा ', अशी कोपरखळी मारत भाऊंसाठी  काहीही करायचं असेल तर हक्काने मला सांगा. मी माझ्यापरीने जितकं करता येईल तितकं करेन, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान- दामले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ साठे यांचे सुपुत्र श्रीरंग साठे यांनी केले तर ऋणानिर्देश भाऊ साठे यांच्या कन्या अल्पना लेले यांनी व्यक्त केले. शिल्पकार भाऊ साठे यांच्या शिल्पांचे प्रदर्शन १९ ऑगस्ट पर्यंत नेहरू सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले असणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...