हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारेलोकप्रिय गायक सिद श्रीरामचे मराठीत दमदार पदार्पण.
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारेलोकप्रिय गायक सिद श्रीरामचे मराठीत दमदार पदार्पणगाण्यातून व्यक्त करणार शिवरुपाचं वर्णन.
झी स्टुडियोजच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगातील एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे ते यातील ‘वाह रे शिवा’ हे गाणं. हितेश मोडक यांच्या जबरदस्त संगीताने आणि मंगेश कांगणे यांच्या तेवढ्याच ताकदीच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं गायलं आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अत्यंत लोकप्रिय असलेल्या सिद श्रीरामने. या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे. गाण्यात तसे अवघड असणारे शब्दही त्याने एवढ्या सफाईदारपणे उच्चारले आहेत की त्याच्या भाषेवरचा दाक्षिणात्य प्रभाव कुठेही जाणवत नाही. हे गाणं आजपासून सोशल मीडिया आणि सर्व नामांकित म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होणार आहे.
हर हर महादेव या चित्रपटाद्वारे छत्रपती शिवरायांचा इतिहास अतिशय भव्य दिव्य स्वरुपात रुपेरी पडद्वार दिसणार आहे. यातील प्रत्येक गोष्ट ही त्याच भव्यतेला साजीशी आणि वेगळ्या स्वरुपाची असावी असा प्रयत्न या चित्रपटाच्या टीमद्वारे करण्यात येत आहे. संगीताच्या बाबतीतही हे वेगळपण ठायी ठायी जाणवणार आहे. चित्रपटातील प्रत्येक गाण्यावर आणि पार्श्वसंगीतावरही (बॅकग्राउंड स्कोअर) विशेष मेहनत घेण्यात आली. यातीलंच एक महत्त्वाचं गाणं असणार आहे वाह रे शिवा. या गाण्याबद्दल बोलताना गीतकार मंगेश कांगणे म्हणाले की, “छत्रपती शिवरायांचं वर्णन करणारी लाखो गाणी आजवर बनली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बनणा-या गाण्यात काय नवेपण मांडायचं हे खरं तर एक आव्हानच असतं. परंतू छत्रपती शिवाजी महाराज एवढं नाव जरी ओठांवर आलं तरी आपसूकच शब्द सुचत जातात. तसंच या गाण्याच्याही बाबतीत झालं आहे.
वैरी उभा बिकट घडी
बेभान झेप-उडी
समशेर धीट खडी
वाह रे शिवा
या ओळींनी सुरुवात होणा-या या गाण्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असणा-या ओळी म्हणजेलुटली शान शरम त्याला उभं छाटलं रुप तुझं शिवा देवाहून मोठ्ठ वाटलं
“महाराष्ट्रावर सुल्तानी संकट आलेलं असताना त्याविरोधात खंबीरपणे उभं राहून सुल्तानशाहीला आव्हान देण्याचं आणि मराठी जनतेचं रक्षण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचं रुप हे देवाहून मोठ्ठं वाटावं ही भावना साहाजिकच मनात येते. तीच भावना या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं” मतही मंगेश कांगणे यांनी यांनी मांडलं. पारंपरिक आणि आधूनिक वाद्यांचा मेळ घालत हितेश मोडक यांनी एक नवी उर्जा निर्माण करणारं संगीत या गाण्याला दिलं आहे.
यावर्षी लोकप्रियतेचे नवनवे विक्रम रचलेल्या पुष्पा चित्रपटातील सुप्रसिद्ध श्रीवल्ली हे गाणं सर्वांनीच ऐकलेलं आहे. हे मूळ दाक्षिणात्य गाणं गायलं आहे लोकप्रिय गायक सिद श्रीराम याने. ज्याला सोशल मीडियावर करोडोमध्ये व्ह्युव्ज मिळाले आहेत. केवळ हेच गाणं नाही तर सिद श्रीरामच्या प्रत्येक गाण्याला अशाच प्रकारे करोडो व्ह्युव्ज मिळत असतात एवढी त्याची लोकप्रियता आहे. आजच्या घडीला तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातीळीवर ख्याती मिळवणा-या या गायकाचं मराठीत पदार्पण होणं ही विशेष बाब आहे. सिद श्रीरामच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही लोकप्रिय ठरेल असा विश्वास चित्रपटाचा संगीतकार हितेश मोडकने व्यक्त केला.
अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या हर हर महादेव या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे य़ांच्या श्री गणेश मार्केटिंग एन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजची असून यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुबोध भावे, बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत शरद केळकर दिसणार आहेत. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर एका विशेष भूमिकेमध्ये झळकणार आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह पाच भारतीय भाषांमधून हर हर महादेव भारतभरात प्रदर्शित होणार आहे.