Friday, November 28, 2025

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत !

 महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे   संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत 

क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ मधील पाच दमदार गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. हेमंत ढोमे यांच्या पोस्टनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणखीच वाढली आहे. 

सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेल्या आणि लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “क्रांतिज्योतीसाठी ‘द फोल्क आख्यान’ यांची निवड केली, कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज व त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण असून आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोन हवा होता.”

संगीतकार हर्ष-विजय म्हणतात, “आमचा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा पहिलाच चित्रपट असून ही आमच्यासाठी खूप मोठी भावना आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्याच मातीच्या आवाजात गाणी बनवली आणि आता तीच कला मोठ्या पडद्यावर नेण्याची संधी मिळणं, ही आमच्या आयुष्यातली खास गोष्ट आहे. आम्ही हेमंत ढोमे यांचे खूप आभारी आहोत की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली.”

येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...