Thursday, November 20, 2025

नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा 'बहर नवा' 'असंभव'मधील नवीन गाणं प्रदर्शित

 नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा 'बहर नवा ''असंभव'मधील नवीन गाणं प्रदर्शित 

‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच  प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची एक सुरेल लहर निर्माण करतंय.  अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यात क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी भावनांचे नाजूक रंग भरलेत. तर अमितराज यांच्या संगीताने या गाण्यात अप्रतिम साज चढवला आहे. 


८० च्या दशकातील या गाण्यात मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या आयुष्यातील एक नवा प्रवास दिसत असून नवं नातं, नवी स्वप्नं, नव्या सुरुवातीची कोवळी चाहूल, एकमेकांवरील विश्वास, आणि नव्या आयुष्याची फुलणारी उमेद… हे सगळं एका मोहक दृश्यात बांधलं गेलंय. दोघांच्या नात्यातील दरवळ हळूहळू खुलत जाताना दिसतेय. प्रेम, आपुलकीचा स्पर्श आणि एकमेकांना समजून घेण्याची कोमल जाणीव गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये भावते. हे सगळं दिसत असतानाच प्रिया बापटची एंट्री गूढ निर्माण करणारी आहे. हा प्रेमाचा त्रिकोण आहे की आणखी काही ? ‘असंभव’च्या रहस्यप्रधान आणि थरारक कथानकात हे गाणं जणू एका शांत वाऱ्याची झुळूक आहे. दरम्यान, या सौम्य बहरामागे दडलेलं रहस्य कोणतं? नव्या नात्यात उमलणाऱ्या प्रेमाच्या सावल्या भविष्यातील कोणत्या वळणाची चाहूल देत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. 



या गाण्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता सचित पाटील म्हणतात, '' 'बहर नवा'  म्हणजे नात्याचं नव्यानं उमलणं… दोन मनांना जोडणारा एक सुरेल श्वास. प्रेम हळूहळू फुलतं, तेव्हा आयुष्याची प्रत्येक पायरी नव्यानं उजळून निघते. हे गाणं त्या नव्या प्रकाशाची गोष्ट सांगतं. हे गाणं म्हणजे आमच्या संगीत टीमची एक सुंदर सांघिक जादू आहे. सूर, शब्द आणि सादरीकरण या तिन्हींच्या संगतीत ‘बहर नवा’ला अशी रंगत आली की,  दृश्यांनाही एक वेगळं भावविश्व लाभलं आहे. कथानकातील महत्त्वाच्या टप्प्यात हे गाणं खास रंगत आणते. 'सावरताना' गाण्यावर संगीतप्रेमींनी जसं प्रेम केलं तसंच प्रेम प्रेक्षक या गाण्यावरही करतील, याची खात्री आहे.'' 

संगीतकार अमितराज म्हणतात,  '' 'बहर नवा' हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट संवाद साधणारं आहे. या गाण्यात सुर, ताल, आणि संगीताचे प्रत्येक घटक अत्यंत काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. गाण्याच्या सुरातील हलक्या बहरांनी नव्या नात्यातील कोवळेपणा आणि उमलणारी उमेद व्यक्त केली आहे, तर तालातील सूक्ष्म लयी आणि संगती भावनांच्या वाढीला हातभार लावतात. आम्ही संगीत टीम म्हणून हे गाणं बनवताना या नात्याची संवेदनशीलता आणि कथानकातील महत्त्वपूर्ण भावनांना संगीताद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची जादू प्रेक्षकांच्या मनातही तशीच उमलेल, याची मला खात्री आहे.'' 

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा  २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...