'घर बंदूक बिर्याणी' चा आगळावेगळा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे ‘सुपरहिट’ चित्रपट दिले आहेत. नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा एक जबरदस्त चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. ‘घर बंदूक बिर्याणी’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाचा टीझर बघून काहीतरी भन्नाट आहे, हे कळतेय. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजच्या साथीने पुन्हा एक आगळावेगळा चित्रपट घेऊन आलो आहे. सयाजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव अफाट होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आकाशसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलोय. आशा आहे प्रेक्षक यालाही उत्तम प्रतिसाद देतील.”