Saturday, September 27, 2025

*स्मिता शेवाळे हिने साकारली आगळी वेगळी नायिका*

 *स्मिता शेवाळे हिने साकारली आगळी वेगळी नायिका* 

 *तुकारामांची आवली ‘अभंग तुकाराम’ मध्ये*

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वारंवार रंगमंचावर आणि पडद्यावर साकारले गेले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा – आवली  प्रेक्षकांसमोर फारशी उलगडली नाही. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रथमच आवलीचे वास्तवाशी घट्ट जोडलेले चित्रण पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारत आहे ताकदीची कलाकार स्मिता शेवाळे, तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयांना पडद्यावर जिवंत करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

तुकाराम महाराज जसे अध्यात्मिक व्यक्तिरेखा आहेत, तसेच आवली ही प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे. संसारातील ओझी, दैनंदिन संघर्ष, जबाबदाऱ्यांची तोलामोल सांभाळत तिने पतीच्या आध्यात्मिक प्रवासाला दिशा दिली. तिच्या शब्दांत राग असला तरी तो वास्तवाची जाणीव करून देणारा आहे; तिच्या तक्रारीत कधी कटूता असली तरी त्यामागे पतीवरचे प्रेम आणि कुटुंबाविषयीची काळजी दडलेली आहे. त्यामुळेच आवली ही फक्त पत्नी नाही, तर तुकारामांच्या अध्यात्माला वास्तवाच्या जमिनीवर घट्ट उभी करणारी शक्ती आहे.

तुकारामांच्या संतत्वाला समाजमान्यता मिळाली, त्यांचे अभंग वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग झाले, यात आवलीच्या त्यागाचे मोलाचे योगदान आहे. संसाराचा गाडा हसत-रडत ओढताना तिने दाखविलेली चिकाटी आणि त्याचवेळी पतीच्या साधनेला दिलेली साथ, हे त्यांच्या नात्यातील गूढ आणि गहिरेपण प्रकट करते.

या चित्रपटात स्मिता शेवाळेने साकारलेली आवली ही आजवर कधीही पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एका ताकदीच्या, संघर्षशील आणि कोमल स्त्रीचे दर्शन होणार आहे. तिची संवादशैली आणि देहबोली आवलीच्या व्यक्तिरेखेला सत्यतेचा आणि अध्यात्मिकतेचा स्पर्श देतात.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’सारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ मधून वारकरी परंपरेतील एका दुर्लक्षित स्त्रीपात्राला नव्या दृष्टीने मांडत आहेत. त्यांच्या दृष्टीने आवली ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नसून, पतीच्या अध्यात्माला आधार देणारे आणि त्याला वास्तवाचे भान देणारे प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे.


‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...