Friday, August 10, 2018




''एखाद्या टीव्ही शोचे सूत्रसंचालन करायला मला खूप आवडेल'' सांगतोय चेतन हंसराज
छोट्या पडद्यावरचा हा खलनायक &TVच्या लाल इश्कमधून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
लाल इश्क ही बऱ्यापैकी नवी संकल्पना आहे. यात प्रेम आणि अतिमानवी शक्ती असे भारतीय लोकांना अत्यंत प्रिय असलेले दोन जॉनर्स एकत्र आले आहेत. तुला काय वाटतं?
लाल इश्क हा प्रेम आणि अतिमानवी शक्ती या दोन अतिशय सशक्त जॉनर्सचा एक जबरदस्त मिलाफ आहे. अतिमानवी शक्तीशी संबंधित कथानक आहे म्हणजे ते भयकथेच्या शैलीतलंच असणार असा भारतीय प्रेक्षकांचा समज असतो. पण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे या मालिकेमधून योग्य पद्धतीने व्यक्त झालं आहे. अशाप्रकारच्या गोष्टीमध्ये मी यापूर्वी कधीही काम केलेलं नव्हतं त्यामुळे या मालिकेच्या संकल्पनेकडे मी आकर्षित झालो. शिवाय ही मालिका दर आठवड्याला नवी गोष्ट अशा एपिसोडिक पद्धतीने सादर होते हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रेक्षकांसाठी तर ही नक्कीच आनंदाची बाब आहे कारण त्यांना प्रत्येक विकेंडला एक नवी गोष्ट आणि नवे चेहरे पाहता येतात. भूमिका स्वीकारण्याआधी मी लाल इश्कचे आधीचे सगळे भाग पाहिले होते आणि मला वाटतं की ते अत्यंत हुशारीने चित्रित करण्यात आले आहेत.
यात तू साकारत असलेल्या पात्राविषयी काही सांगशील का?
यात मी काळ्या जादूच्या खल बाजूकडे आकर्षित झालेल्या मोठ्या भावाचे पात्र साकारत आहे. त्यामुळे या पात्राच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले आहेत व त्यामुळे या पात्राच्या मनात कुटुंबियांबद्दल कडवट भावना आहेत.
तू कधी कोणत्या तांत्रिकाकडे गेलायस का किंवा एखाद्या तांत्रिकाबद्दल एखादी विक्षिप्त गोष्ट ऐकली आहेस का?
नाही, मी कधीही कोणत्याही तांत्रिकाकडे गेलेलो नाही. माझा काळी जादू या संकल्पनेवर विश्वासही नाही. माझ्या ओळखीच्या काही लोकांकडून मी तांत्रिकांच्या काही गोष्टी ऐकल्या आहेत पण त्या खास नव्हत्या. पण विरोधाभास म्हणजे पडद्यावर मी तांत्रिकाची भूमिका दुसऱ्यांदा साकारत आहे. मी साकारलेल्या करड्या छटांच्या पात्रांमुळे मला अशा भूमिका साकारण्याची संधी मिळते हे एक नवलच आहे. (हसतो)
तू कितीतरी टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक पात्रं रंगवली आहेस. एखादं वेगळ्या प्रकारचं पात्र साकारायला तुला आवडेल का?
संधी मिळाली तर मला पोलीस नाहीतर गुप्तहेराची भूमिका करायला नक्कीच आवडेल. शिवाय, मला टीव्हीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करायलाही खूप आवडेल. हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नसणार. पण मला ते करून पहायचं आहे.
बॉलिवूडमधला तुझा आवडता खलनायक कोण?
माझा आवडता खलनायक नक्कीच अमजद खान आहे. खलनायकाची भूमिका त्यांच्याइतक्या ऊर्जेने आणि उत्साहाने साकारणारी दुसरी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. नकारात्मक भूमिका साकारण्याच्या बाबतीत त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. त्यांनी स्वत:चा एक छाप तयार केला आहे आणि त्यांच्या जवळपास जाणारी कामगिरी करणं हे कुणासाठीही आव्हानात्मकच आहे.
तुझा अतिमानवी शक्तींवर विश्वास आहे का? कधी अशा गोष्टींचा अनुभव आला आहे का?
अगदीच अतिमानवी शक्ती असं मी म्हणणार नाही, पण माझा आत्म्यांवर विश्वास आहे जे आपल्या अस्तित्त्वाचाच एक भाग असतात. चांगले आत्मे आणि दुरात्मे या दोन्ही गोष्टी या विश्वाचा भाग आहेत. मला त्यांच्या शक्तीचा प्रत्यय कधीही आलेला नाही पण ते असतात यावर माझा विश्वास आहे.
तू कधी कुणाला भुताटकीचं नाटक करून घाबरवलंय का? नसेल, तर अशाप्रकारे घाबरवायला तुला आवडेल?
हो, असे प्रकार बहुतकरून हॅलोविनच्या काळात केले आहेत. मला आणि माझ्या मित्रांना भूत बनून येणार्या जाणार्यांना घाबरवाला खूप आवडायचं. नंतर आम्ही त्यावर भरपूर हसायचो.
तुला कोणत्या जुन्या गाजलेल्या प्रेमकहाणीला अतिमानवी शक्तींच्या कथानकाची जोड द्यावीशी वाटेल? आणि या गोष्टीत कोणत्या अभिनेत्याला घ्यायला आवडेल?
हम दिल दे चुके सनम. यात सलमान खानची भूमिका असल्याने या कहाणीला अतिमानवी शक्तींचं वळण मिळालं तर ते पाहणं मोठं रोचक ठरेल.
अभिनेत्यांच्या ताज्या फळीतील तुझा आवडता अभिनेता?
मिल्येनियल्सच्या फळीतील अभिनेत्यांपैकी रणवीर सिंग हा सर्वात हरहुन्नरी कलाकार आहे त्याच्याकडे प्रतिभेचं भांडार आहे. त्याच्या अलीकडच्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याने विलक्षण काम केलं आहे.
अभिनय वगळता तुला छान जमतात अशा तीन गोष्टी कोणत्या?
अनेकांना हे माहीत नसेल पण अभिनयाबरोबरच मी पटकथा लिहिण्यात आणि कम्प्युटर ग्राफिक्स बनविण्यात तरबेज आहे. जेव्हा कधी दोन प्रकल्पांच्या दरम्यानच्या काळात मला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी मी त्याचा अधिकाधिक वापर करतो. मी थ्रीडी गेम्स डेव्हलप करायलाही शिकलो आहे आणि मला ते बऱ्यापैकी जमतंय. गेम्स आणि व्हीएफएक्सच्या क्षेत्रात लवकरच मी एक छोटासा उद्योगही सुरू करणार आहे. 
येत्या काळात कोणत्या प्रकल्पांमध्ये काम करणार आहेस?
मी सध्या टीव्हीवरच्या दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये व्यग्र आहे शिवाय सैफ अली खानची भूमिका असलेल्या कप्तान या आगामी चित्रपटात माझी भूमिका आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...