Wednesday, January 15, 2025

प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट

 प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट

’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथांची निर्मिती करणारे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा करत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ची कथा केवळ तरुण तरुणी भोवती फिरणारी होती. तर ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ कोणत्याही सिक्वेलसारखा नसलेला कथा पुढे नेणारा एक चित्रपट होता आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ यातही एक अनोखा दृष्टीकोन पाहायला मिळाला. सतीश राजवाडे यांच्या ’प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही भावनिक कहाणी होती. तर 'ती सध्या काय करते' मध्ये बालपणाच्या प्रेमाची आठवण करून देणारी गोड गोष्ट होती. या सगळ्या चित्रपटांनंतर आता ‘प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाविन्य म्हणजे यात व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. 'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असल्याने हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. 

प्रेमाचे नशीब, नशीबातील प्रेम बदलणारी एक नवीन गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच नव्या धाटणीचे चित्रपट घेऊन येतो. प्रेमकथांमध्ये नेहमीच वेगळं आणि हटके कथानक देऊन प्रेक्षकांचे मन जिंकणारा दिग्दर्शक पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी नव्या पिढीची प्रेमकथा घेऊन येत आहे. ही केवळ एक प्रेमकथा नसून व्हीएफएक्सच्या थक्क करणाऱ्या दृश्यांसह एक अप्रतिम अनुभव असेल. प्रेक्षकांना ही नवी संकल्पना नक्कीच आवडेल. यात अशी भावना आहे, जी प्रत्येक पिढीला, वयाला आपल्या जवळची वाटेल.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “प्रेक्षकांनी आमच्या आधीच्या चित्रपटांना खूप प्रेम दिले. आता एक अशीच नवी प्रेमकथा ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटात पाहायला मिळेल. काळाबरोबर पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे कथानकाचे सादरीकरणही त्याला साजेसं हवं. यात प्रेमकथाच नाही तर ती सादर करायची पद्धतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडवली आहे. त्यामुळे ही प्रेमकथा काळाच्या पुढे जाणारी नवीन युगाची प्रेमकथा ठरणार आहे. प्रेमाची एक वेगळी बाजू यात दिसेल. प्रेम आणि नशीब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम फार वेगळा असतो. प्रेम आणि नशिबाचा हा मनोरंजनात्मक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी नेहमीच प्रेक्षकांना पैसा वसूल करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Tata Mumbai Marathon 2025 Race Route

Tata Mumbai Marathon 2025  Race Route Tata Mumbai Marathon 2025 Race Route unveiled at the technical press conference (L to R), Mandar Pandy...