१४ नोव्हेंबर बालदिन... सर्वांचा आवडता दिवस. आपण कितीही मोठे झालो तरी या दिवशी लहान होऊन हा दिवस साजरा करण्याची इच्छा होतेच. आपल्या लहानपणी या दिवशी आपण मोठ्यांकडून विशेष लाड पुरवून घेतलेले असतात आणि आता मोठे झाल्यावर त्याच गोड क्षणांच्या आठवणीत रमलेलो असतो. अशाच काही सुंदर आठवणी, अंतरंगी किस्से अभिनेत्री रीना मधुकरने शेअर केल्या आहेत.
बालपणीचं टोपण नाव ‘रीनू’ उर्फ आपली रीना हिचे बालपण जितके कम्फर्टेबल होते तितकेच शिस्तबद्ध देखील होते, ते कसं, याविषयी सांगताना रीना म्हणाली, “माझे बाबा एअरफोर्सचे रिटायर्ड ऑफिसर आहेत. एअरफोर्सचे ऑफिसरची जबाबदारी पार पाडताना त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला योग्य अशी शिस्त लावली. गुड मॉर्निंग, गुड नाईट, थँक्यु, सॉरी म्हणायच्या सवयी लावल्या. वेळेची शिस्त पाळायला शिकवली. आई-बाबांनी आम्हांला कधी कशाची कमी भासू दिली नाही, पण हो, आज मागितलं की ते लगेच मिळणं ही सवय त्यांनी आम्हांला कधी लावलीच नाही कारण त्यांना आम्हांला स्ट्रगल काय असतो, मेहनत काय असते हे शिकवायचं होतं. प्रत्येक गोष्टींची जाणीव करायला शिकवली.”
तुमच्या बाबतीत असं झालंय का की, टिव्ही वरची एखादी जाहिरात तुम्हांला इतकी आवडते की झोपेत असताना जरी ऐकू आली तरी तुम्ही त्यावर उठून नाचाल? नाही ना... मात्र रीनाच्या बाबतीत असं झालंय. तिचा हा मजेदार किस्सा सांगताना रीना म्हणते, “‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जाहिरात आणि त्यामध्ये गोल-गोल फिरणारी ऍनिमेटेड मुलगी मला इतकी प्रचंड आवडायची कि पप्पा मला सांगायचे, मी जरी झोपलेली असली तरी टिव्हीवर ती जिंगल ऐकू आली की मी तडक उठायचे, गोल गोल फिरायचे आणि परत झोपायचे. हा माझा मजेदार किस्सा मला आता आठवूनही खूप हसायला येतं.”
“लहानपणी अभ्यास पूर्ण नाही झाला तर टीचर ओरडतील, आवडतं चॉकलेट नाही मिळालं तर? एवढंच काय ते टेन्शन होतं. आणि आता मोठे झाल्यावर किती टेन्शन्स, विचार असतात... मी बालपणातला निरागसपणा, केअरफ्री राहणं आणि कशाचंही टेन्शन न घेणं या गोष्टी जास्त मिस करतेय,” असं रीना म्हणाली.
बालपणाविषयी गाण्यातून व्यक्त व्हायचं असेल किंवा बालपणाला एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते गाणं असेल _‘छोटा बच्चा जान के ना आँख दिखा ना रे...’_ असं रीना सांगते. पुढे ती म्हणाली, “जरी मी छोटी दिसले तरी मी एका मिसाईल रॉकेटसारखी होती. मला कोणी काही बोललं किंवा शाळेत कोणी त्रास दिला तर समोरच्याला उत्तर देण्यासाठी मी तयार असायचे. ‘मुळात, मुलगी म्हणून हे नाही करायचं, असं नाही वागायचं असं माझ्या घरात कधी झालंच नाही. पप्पांनी आम्हांला नेहमी मुलांसारखं वाढवलं आहे. ‘अरे ला का रे’ करणारे मी आणि माझी बहिण आहोत, त्याचबरोबर आम्ही प्रेमळ पण आहोत. त्यामुळे हे गाणं अगदी परफेक्ट आहे.”