Tuesday, May 13, 2025

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते "स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" लोकप्रिय जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना प्रदान!

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते "स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" लोकप्रिय जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना प्रदान!

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २८ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" नुकताच लोकप्रिय जेष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कविता पौडवाल, नितीन तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या खार येथील निवास्थानी प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार - म्युझिशियन होते. आजचा हा २८ वा सोहळा आहे. ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, अश्या कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी अरुणजींसोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे."

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर म्हणाल्या, "हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते, माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. ते अनिल - अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला, मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना  उजाळा मिळाला आहे." 

हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. या प्रसंगी उत्तराताईंनी 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली' हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले तसेच याप्रसंगी 'अशी ही बनवाबनावी' मधील गीतकार सुधीर मोघे लिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं 'कोणी तरी येणार येणार गं' या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन स्व. अरुण पौडवाल यांचे निस्सीम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक श्री चंद्रशेखर महामुनी यांनी केले.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...