‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील टायटल साँग प्रदर्शित
कैलास खेर यांच्या आवाजातील हे गीत ठरतेय प्रेरणादायी
‘वामा - लढाई सन्मानाची’ या चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून, रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर करण्यात आलेले हे गीत मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून रिजू रॉय यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. हे गाणे म्हणजे सन्मानासाठी लढणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे.
या गाण्यातून केवळ संघर्षच नाही तर एक सामाजिक संदेशही उमटतो. 'वामा लढाई सन्मानाची'चे बोल अतिशय शक्तिशाली असून ते संघर्ष, आत्मगौरव आणि नारीशक्तीच्या उभारणीचे दर्शन घडवतात. चित्रपटाच्या आशयाला साजेसे असे हे टायटल साँग स्त्रीच्या संघर्षाची आणि सन्मानासाठीच्या लढाईची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.
गाण्याबद्दल गायक कैलास खेर म्हणतात, '' हे टायटल साँग इतके ऊर्जेने भरलेले आहे, की ते ऐकताना आपसूकच एक बळ मिळते. या गाण्याचे बोल प्रत्येक स्त्रीला बुद्धिमान, निर्भय आणि जिंकण्यासाठी सज्ज करणारे आहेत. हे गाणे खरंतर महिलांच्या सक्षमीकरणाचे ब्रीदगीत आहे, असे म्हटले तरी चालेल.''
दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणतात, '' कैलास खेर, मंजिरी गांगुली यांचा दमदार आवाज, संगीताची लयबद्धता आणि शब्दांतील स्फूर्ती एकत्र येऊन बनलेले हे टायटल साँग एक संस्मरणीय अनुभव देणारे आहे. या प्रेरणादायी गाण्यात लढ्याचा, आत्मसन्मानाचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा झणझणीत संदेशही आहे. मला खात्री आहे, हे गाणे प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''
ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा - लढाई सन्मानाची’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST