अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत 'आई' हा भावस्पर्शी अल्बम पहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय' संगीतप्रेमींच्या भेटीला
संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले यांनी सर्व गाण्यांना संगीताची जोड दिली आहे. अल्बममधील पहिले गाणे ‘सोप्पं नव्हं माय’, नुकतेच प्रदर्शित झाले असून याचे गीतलेखन वैभव जोशी यांनी केले आहे. यात लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब झळकत असून, एक हळवं आणि संवेदनशील दृश्यरूप यात पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला या अल्बममधील एक गाणे प्रदर्शित होणार असून समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत.
या अल्बमच्या पार्श्वभूमीवर ‘आई’ या संकल्पनेवर आधारित एक विशेष पॉडकास्ट सादर करण्यात आले. या पॉडकास्टमध्ये 'आई' या नात्याचा भावनिक वेध घेत कलाकार मंडळींनी आपल्या अनुभवांची मनमोकळी चर्चाही केली.
या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आई या नात्याला शब्दांत पकडणं शक्य नाही, परंतु गाण्यातून त्या भावना पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. ही केवळ गाणी नाहीत, तर प्रत्येकाची एक व्यक्तिशः भावना आहे, आईसाठी. ‘आई’ या नात्याच्या असंख्य पदरांना स्पर्श करणारा हा अल्बम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी आशा आहे.''
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST