Wednesday, June 17, 2026

‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव

 ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव

‘छोटा मराठा’ शब्दप्रयोगावर आक्षेप; चित्रपटगृह जाळण्याचा इशारा, राज्यभर आंदोलन पेटण्याची शक्यता.  

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि अनेक ठिकाणी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाभोवती आता नव्या वादाचे वलय निर्माण झाले आहे. चित्रपटामध्ये मराठा समाजाचा उल्लेख कथितपणे ‘छोटा मराठा’ असा करण्यात आल्याचा आरोप करत ‘मराठा क्रांती मोर्चा’ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सेन्सॉर बोर्ड तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून चित्रपटावरील आक्षेपार्ह भाग हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अशा समाजाचा उल्लेख कोणत्याही चित्रपटात कमीपणा दर्शविणाऱ्या शब्दांत होणे समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘छोटा मराठा’ हा शब्दप्रयोग समाजात मोठा-छोटा असा भेद निर्माण करणारा असून तो समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा असल्याचे मोर्चाचे म्हणणे आहे.

निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांच्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाची प्रदर्शना आधीपासूनच मोठ्या प्रमाणात चर्चा होती. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक प्रश्न आणि विविध संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने त्याच्या आशयाबाबत अनेक स्तरांवर चर्चा रंगली होती. चित्रपटाच्या सेन्सॉर प्रक्रियेदरम्यानही काही अडथळे आल्याची चर्चा होती. मात्र आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी मिळाली आणि त्यानंतर राज्यातील विविध चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी त्यातील विषय मांडणीचे कौतुक केले, तर काही सामाजिक संघटनांनी चित्रपटातील काही संदर्भांवर आक्षेप नोंदवले. आता मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अभय पाटील यांनी या प्रकरणी थेट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

मोर्चाच्या म्हणण्यानुसार, जर चित्रपटामध्ये समाजाच्या भावना दुखावणारे संवाद किंवा संदर्भ असतील, तर सेन्सॉर बोर्डाने ते कशाच्या आधारे मंजूर केले, हा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या मजकुराची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने आणि सेन्सॉर बोर्डाने योग्य ती दखल घेतली नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तथापि, आंदोलनाचे स्वरूप आणि पुढील भूमिका याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही पदाधिकाऱ्यांकडून चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देत, चित्रपट दाखवला तर चित्रपट गृहाला आग लावू असा सज्जड दम देण्यात आला आहे.  

या संपूर्ण वादावर चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे चित्रपट निर्मिती संस्थेकडून या आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाबाबत सध्या दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत. एका बाजूला चित्रपटातील सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवरील भाष्याचे स्वागत करणारा वर्ग आहे, तर दुसऱ्या बाजूला काही समाजघटकांनी चित्रपटातील विशिष्ट संदर्भांवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांमधील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालय, गृह विभाग आणि सेन्सॉर बोर्ड यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तक्रारीची दखल घेऊन चित्रपटाचे पुनर्परीक्षण होणार की प्रकरण केवळ आंदोलनाच्या इशाऱ्यांपुरते मर्यादित राहणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अखिल भारतीय बंजारा समाजाच्या वतीने संजीवकुमार यांना काही आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे. ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरील हा वाद पुढील काळात अधिक तीव्र होतो की संवादातून मार्ग निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

_________________________

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव

 ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव ‘छोटा मराठा’ शब्दप्रयोगावर आक्षेप;...