Press Note: “जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असा आहे ‘हिरकणी’चा कडा
“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असा आहे ‘हिरकणी’चा कडा
“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करुन बसली आहे. राहून-राहून मनात प्रश्न उपस्थित राहतो की, तो कडा हिरकणी नेमकी कशी उतरली असेल कारण ‘हिरकणी कडा उतरली’ इतकंच वर्णन पाठ्यपुस्तकात करण्यात आलं होतं.
पण खरं तर, तो कडा किती खोल होता याचा अनुभव हिरकणी सिनेमाच्या टीमने घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. धाडसी आईची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही...
“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असं वर्णन कड्याचं करण्यात आलं आहे. तसेच, “दीड गाव खोल दरी” असं देखील वर्णन करण्यात आले आहे. अंगावर शहारे येतील असं वर्णन जर कड्याचं करण्यात आलं आहे तर हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता... पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील याचा विचार सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केला.
प्रसाद ओक आणि त्यांचं २५ जणांचं युनिट यांनी रायगडावर जाऊन गडाची आणि त्या कड्याची पाहणी केली. त्या रात्री नेमके कसे आणि काय घडले असेल याचा अंदाज बांधण्यासाठी २५ जणांचं युनिट हिरकणी बुरुजावर भर पावसात गेलं होतं. साधी गवळण असलेल्या हिरकणीने कसं काय हे धाडस केलं असेल याचा विचार करुन तिने उचललेले धाडसी पाऊल सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ सिनेमात सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आहेत. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. २४ ऑक्टोबरला दिवाळीची मनोरंजक भेट म्हणून ‘हिरकणी’ येतेय तुम्हा सर्वांना भेटायला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात...
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST