Monday, January 27, 2020

Smita Tambe gets appreciation for her performance in Film Panga

अभिनेत्री स्मिता तांबे ह्यांची नुकतीच पंगा फिल्म झळकली. ह्या सिनेमात भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टनच्या भूमिकेत दिसलेल्या स्मिता तांबे ह्यांच्याशी त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद

पंगा सिनेमामध्ये तुम्ही स्मिता तांबे ह्याच भूमिकेत दिसला आहात भूमिकेचे नाव तुमच्याच नावाने असण्याचे काय कारण आहे ?
-          पंगा सिनेमा मला ऑफर झाला. तेव्हा भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टनची भूमिका मला ऑफर झाली होती. ह्या भूमिकेचे नाव माझ्याच नावावरून ठेवण्यात आले होते, ह्याचे मलाही आश्चर्य वाटले. ही माझी अशी पहिली फिल्म आहे ज्यात मी स्मिता तांबे ही माझ्याच नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. खरं तर लेखकाने माझा उल्लेख संहितेत कॅप्टन एवढाच केला होता. पण सिनेमाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी ह्यांनी माझी भारतीय कबड्डी टिमच्या कॅप्टन ह्या भूमिकेसाठी माझी निवड केल्यावर मग भूमिकेला माझं खरं नाव देण्याचा विचार केला. मी साकारत असलेल्या ह्या स्मिताचं कब्बडी हे पॅशन आहे. माझ्यात आणि ह्या भूमिकेतलं हेच साम्य पडद्यावर ही भूमिका साकारताना मला उपयोगी पडलं.  

तुम्ही ह्यात कबड्डी टिमच्या कॅप्टनच्या भूमिकेत आहातह्याआधी कधी कबड्डी  खेळला होतात का?
-          मी शाळेत असताना कबड्डी खेळायचे. त्यानंतर शिक्षण आणि नंतर अभिनय क्षेत्रात करीयर यामूळे कबड्डी मागे राहिली. पण ह्यासिनेमानिमीत्ताने माझ्यातली कबड्डी प्लेअर पुनरूज्जीवीत झाल्यामूळे मला खूप आनंद मिळाला. सिनेमात आपण जया निगमचा (कंगना रनौत) आपल्या आवडत्या खेळासाठीचा एक प्रवास पाहतो. तशीच ह्या सिनेमामूळे माझ्यामधली जया निगम सुखावल्याचं मला जाणवलं. सिनेमाच्यावेळी आमची कोच गौरी तर आम्हांला एखाद्या खरोखरीच्या स्पर्धेसाठी शिकवत असल्यासारखी कबड्डी शिकवायची. एखाद्या कसलेल्या खेळाडूने जेवढी कब्बडी स्पर्धेसाठी तयारी करावी, तेवढी आम्हाला कोचने करायला लावली होती.  

सिनेमासाठी काय तयारी केलीत?
-          जवळपास दिड वर्ष मी कबड्डीची प्रॅक्टिस केली. माझी दिनचर्याच कबड्डीमूळे बदलून गेली होती. रोज सकाळी सहा वाजता मैदानात प्रॅक्टिसला पोहोचायचे. एखाद्या खेळाडूसारखाच माझा व्यायाम आणि आहार असायचा. माझ्या सिनेमातल्या बॉडीलँग्वेजमधून ही भारतीय कबड्डी टिमची कॅप्टन असल्याचे जाणवण्यासाठी माझ्या नसानसात हा खेळ भिनणं ही माझी जबाबदारी होती. मला सेटवर सगळे कॅप्टन म्हणूनच संबोधायचे त्यामूळेही मला आपण टिमचे नेत्तृत्व करत असल्यासारखे वाटायचे. आणि आपोआप भूमिका साकारायला त्यामूळे मदत झाली.

अश्विनी अय्यर तिवारी ह्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
-          अश्विनीमॅमची एक खासियत आहे की, सेटवर शंभर माणसं असतील तरीही, त्यांचे सेटवरच्या प्रत्येकाशी एक वेगळं नातं निर्माण होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वातचं ती काहीतरी एक खासियत आहे. त्या तुमच्याशी खूप आत्मियतेने बोलतात. पंगाच्या शेवटच्या दिवशी तर अश्विनी मॅमने मला स्वहस्ते एक पत्र लिहून दिले. एवढ्या मोठ्या दिग्दर्शिकेने माझं केलेलं कौतुक भारावून टाकणारं आहे. ते पत्र माझ्यासाठी खूप खास आहे. ते मी माझ्या घराच्या भिंतीवर फ्रेम करून आज लावलंय.

कंगना रनौत सोबत स्क्रिन शेअर करण्यासोबत काय सांगाल?
-          कंगना रनौत ही एक प्रगल्भ अभिनेत्री आहे. मी तिच्या अभिनयाची चाहती आहे. तिच्यासोबत सेटवर वावरताना मी तिचे अनेकदा निरीक्षण करायचे. ती खूप तन्मयतेने काम करते. कबड्डी खेळताना फुटवर्क कसे असावे, त्याचवेळी भूमिकेनूसार करावा लागणारा आंगिक अभिनय याचा खूप सुक्ष्म पातळीवर कंगनाचा अभ्यास असायचा.  सिनेमामध्ये स्मिता(स्मिता तांबे) आणि जया(कंगना रनौत) ह्यांच्यात एक व्दंव्दं दाखवलंय. अशावेळी कॅप्टन स्मिता एका सीनमध्ये जयाला म्हणते की, चलो कमसे कम इस बहाने तुम मॅट पे तो आयी’ ... त्यावेळी कंगना मॉनिटरसमोर उभी राहून माझा अभिनय पाहत होती. आणि मला सीननंतर तुझे डोळे इंटेन्स आहेत, अशी कॉम्प्लिमेन्ट दिली. तो क्षण मी कधीच विसरू शकतं नाही.

रिचासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
-          पाण्यामध्ये एखादा रंग मिसळून जावा, तशी रिचा लोकांमध्ये मिसळून जाते. रिचा आणि माझे सिनेमात एकत्र सीन नसले तरीही, तिने आणि मी एकत्र कबड्डी प्रॅक्टिस केलेली आहे. अभिनेत्री म्हणून मला तिचा खूप आदर आहे. खरं तर कोणत्याही सिनेमाच्या तयारीची दिड महिन्याची प्रक्रिया असते.पण ह्या सिनेमाची मात्र दिड वर्ष तयारी आम्ही केली. आणि आता ती तयारी फळाला आली असं म्हणावे लागेल.


जशी पंगा सिनेमामध्ये जया निगम समाजव्यवस्थेशी पंगा घेते तसा पंगा तुम्ही कधी ख-या आयुष्यात घेतलाय का ?
-          हो मी सिनेसृष्टीत जेव्हा पाऊल ठेवले होते. तेव्हा सामान्य दिसण्यामूळे’ मला रिजेक्शनला सामोरे जावे लागले. पण त्यामूळेच स्वत:ला अभिनेत्री म्हणून सिध्द करायचं बळ मला मिळाले. त्यामूळे कुठेतरी जयामध्ये मी स्वत:ला पाहत होते. 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...