या’साठी सुमंत शिंदेने घेतली विशेष मेहनत
बॅाईज’, ‘बॅाईज २’ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीर या तिकडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. आता पुन्हा एकदा हे तिघे हीच धमाल तिप्पटीने करायला सज्ज झाले आहेत. विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ३’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक विषय विशेष गाजत आहे तो म्हणजे कबीरची कुस्ती. यात कबीर खऱ्याखुऱ्या पैलवानांबरोबर कुस्ती खेळला आहे. कोणतीही भूमिका साकारताना त्यासाठी त्याची तयारी, अभ्यास हा करावा लागतोच. खऱ्या पैलवानांबरोबर कुस्ती खेळणे कबीरसाठी म्हणजेच सुमंत शिंदेसाठीही निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आणि त्याच्या या मेहनतीचे चीज झाले. अर्थात यात त्याला ॲक्शन दिग्दर्शकांची बरीच मदत झाली.
सुमंत शिंदेच्या मेहनतीबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ कुस्ती म्हणजे महाराष्ट्राची शान. कथेचा भाग म्हणून आम्ही कुस्तीचा समावेश केला. हे वास्तववादी वाटावे, म्हणून यासाठी आम्ही खरे पैलवान घेतले. या पैलवानांबरोबर कबीरला कुस्ती खेळायची होती. कबीरसाठी हे जरा कठीण होते मात्र यातील बारकावे जाणून घेऊन तो त्या पैलवानांसमोर अगदी आत्मविश्वासाने उभा राहिला आणि यात त्याला साथ लाभली ती ॲक्शन डिरेक्टरची. कारण दोन अशा व्यक्तींना समोर आणायचे होते, ज्यातील एक कुस्तीत तरबेज आहे आणि दुसरा असा ज्याला कुस्तीची काहीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांच्यात योग्य सांगड घालण्याचे काम ॲक्शन डिरेक्टरने केले. पैलवान कबीरला उचलून जमिनीवर आदळतो. फेकण्याचा वेग पाहता जराही चूक झाली असती तर कबीरला दुखापत होऊ शकली असती. मात्र याचाच ताळमेळ ॲक्शन डिरेक्टरने उत्तम साधला आहे. हा अगदी छोटासा सीन आहे पण त्यामागची मेहनत प्रचंड आणि ही मेहनत प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच.’’
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॅाडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी सांभाळली आहे. ‘बॅाईज ३’मध्ये पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे यांच्यासह विदुला चौगुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST