Friday, September 30, 2022

सहेला रे' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हरवत चाललेल्या मैत्रीला नवी पालवी देणारा 'सहेला रे' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' वेबचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून काळाच्या विळख्याआड हरवून गेलेल्या 'ती' च्या अस्तित्वाला मैत्रीच्या हळुवार झुळकीने पुन्हा जिवंत करून, एक नवीन संजीवनी देणाऱ्या 'ती' च्या आयुष्याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे 'सहेला रे'. मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या परिपक्व नात्यातील विविध छटा यात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान या वेबचित्रपटातील 'रे मनाला' हे मनाला भिडणारे गाणेदेखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला आदर्श शिंदे यांचा बहारदार आवाज लाभला आहे. मनातील चलबिचल व्यक्त करणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत. तर सलील कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. 

आयुष्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना गृहीत धरता धरता नात्यातील हरवून गेलेला गोडवा पुन्हा मिळवण्यासाठीची 'ती'ची धडपड ट्रेलरमधून दिसत आहे. या धडपडीत तिला तिचे अस्तित्व गवसेल का, याचे उत्तर 'सहेला रे' पाहिल्यावरच मिळेल. 

चित्रपटाबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणतात, " काही अनुकूल परिस्थिमुळे आयुष्याच्या परिघापलीकडे लोटली गेलेली माणसे जेव्हा पुन्हा आयुष्यात परतात, तेव्हा होणारी मनाची चलबिचल एका क्षणात भूतकाळात नेऊन उभी करते आणि त्यातूनच मग तिला तिचा स्वतःचा शोध लागतो. नात्यातील परिपक्वता यात अधोरेखित करण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो वास्तववादी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी अशाच पद्धतीने नाही परंतु थोड्याफार प्रमाणात असे क्षण येतात. 'प्लॅनेट मराठी'च्या सोबतीने हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मला आशा आहे, 'सहेला रे' नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'' 

 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "वैविध्यपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. अशीच एक संवेदनशील, परिपक्व नात्याची कथा असलेला 'सहेला रे' आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. उत्तम कलाकार, गायक, संगीतकार यांची संपूर्ण टीम एकत्र आल्यावर नक्कीच काहीतरी उत्कृष्ट घडणार. 'सहेला रे' सर्वांना निश्चितच आवडेल."

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी प्रस्तुत, मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema Legendary Sharmila Tagore and National Award Winner Rituparna Se...