अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता 'मिलिंद गुरव' झळकणार रूपेरी पडद्यावर
कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता 'मिलिंद गुरव' प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक 'अभिजीत मोहन वारंग' यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला कोकणप्रेमी चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेता मिलिंद गुरव त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या अनुभवाविषयी सांगतो, "मी मूळचा कोकणातील रहिवाशी आहे. माझा हा मालवणी भाषेतील पहिलाच सिनेमा असून, मालवणी भाषेत चित्रपट करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसंच राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सरांनी मला या सिनेमात काम करण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी गेली 8 वर्ष महाविद्यालयात शिक्षक आहे. तसेच यापूर्वी मी एकांकिका, नाटक, वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या विनोदी भूमिका केल्या आहेत. या सिनेमातील खलनायकाची भूमिका ही माझ्यासाठी फार आव्हानात्मक होती. परंतु अभिजीत वारंग सरांच्या दिग्दर्शनाखाली मी या भूमिकेला माझ्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मला मिळालेल्या यशात माझ्या आई वडिलांचा, कुटुंबाचा आणि गुरूंचा, कणकवली शिक्षण संस्थेचा खारीचा वाटा आहे. पहिल्यांदाच सिनेमात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे मला स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतंय.
या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा शेअर करताना मिलिंद सांगतो, "कोकणातील निसर्गरम्य ठिकाणं, मालवणी संस्कृती व परंपरा, बोली भाषेतील गोडवा आणि अस्सल मालवणी प्रेमकथेचा परिपाक म्हणजे 'प्रेम प्रथा धुमशान' हा सिनेमा. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐन पावसात कोकणातल्या गर्द झाडीत टेन्टमध्ये राहण्याची मजा काही औरच होती. जंगलामध्ये शूट करत असल्यामुळे पाऊस आला की टेन्ट मध्ये पळावं लागायचं. माझी खलनायकाची भूमिका थोडी सिरीयस असल्यामुळे मी शूटिंगच्या दरम्यान कुणाशी जास्त बोलायचो नाही. मी भूमिकेतच असायचो. माझ्या चेहऱ्यावर सारखे बारा वाजलेले असायचे, राग असायचा त्यामुळे शिवालीने मला 'कबीर सिंग' असं नाव ठेवलं होतं. तीच पाहून सगळे मला त्याचं नावाने हाक मारायचे."
पुढे तो सांगतो, "कोकणातील पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेलं आहे. मी सर्व सिनेरसिक प्रेक्षकांना विनंती करतो. की त्यांनी हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की पाहावा. तसेच कोकणातल्या निसर्गाचा आणि संस्कृतीचा आस्वाद घ्यावा."
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST