Sunday, June 29, 2025

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी - तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई

 'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी

तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई 

मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले  आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.  

या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ''जारण’सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात, तेव्हा एक निर्मिती फक्त प्रकल्प न राहाता एक भावनिक बंध जुळले जातात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आम्हाला नव्याने ऊर्जा दिली आहे. या चित्रपटामध्ये हृदयस्पर्शी कथा आणि परिश्रमांची गुंफण आहे. यशाच्या या टप्प्यावर पोहोचताना आमच्या संपूर्ण टीमने ज्या श्रद्धेने काम केले, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचे आज सिद्ध झाले आहे.”

निर्माते अमोल भगत यांनी यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, '' जारण’सारखा आशयघन सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. हे यश म्हणजे आमच्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. प्रेक्षकांसाठी अशाच आशयप्रधान, अर्थपूर्ण आणि भावनिक कथा घेऊन आम्ही नक्कीच येऊ.’’

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि एथ्री इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. तर निर्मितीची जबाबदारी अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी सांभाळली असून मनन दानिया सहनिर्माता आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष व अनिता दाते यांच्यासह किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचा दमदार अभिनय अनुभवायला मिळतो.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...