Thursday, August 21, 2025

'बिन लग्नाची गोष्ट'ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित

 'बिन लग्नाची गोष्ट'ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित 

नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच आता या चित्रपटाबद्दलचीही उत्कंठा आधीपासूनच वाढलेली आहे. 

ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरणारी दिसतेय. प्रिया प्रेग्नन्ट असून, कामामुळे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे प्रिया -उमेशमध्ये नोकझोकही दिसतेय. या नात्यातील गोड-तिखट प्रसंग दाखवतानाच, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया काहीशी नाराज असल्याचे दिसतेय, तिच्या नाराजीमागचे कारण काय? गिरीश-निवेदिताच्या अटी काय आहेत? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार? यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या पात्राचाही काही भूतकाळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी केमिस्ट्री, प्रिया-उमेश यांचा गोड संसार आणि या चौघांमधली संवादांची टक्कर, प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणारी ठरणार आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, "एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असताना त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता, संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय कोण करणार? त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनीही होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती. हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच खरा पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.'' 

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ''हा चित्रपट मनोरंजनासोबतच नात्यांच्या बदलत्या परिभाषेवर विचार करायला लावणारा आहे. आजच्या पिढीचं राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा हे सगळं ‘बिन लग्नाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा कारण तो हसवतो, विचार करायला लावतो आणि नात्यांची सुंदरता नव्याने दाखवतो.”

गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक,  सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...