Wednesday, August 13, 2025

बाप - मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये! 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

                                   बाप - मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये!                                                                          'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित 

सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ नुकतंच प्रदर्शित झालं असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो  असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप - मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप याने ते गायलं आहे. या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, ‘’बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे.’’

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, '' आवशीचो घो’ हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!'' 

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, '' 'दशावतार'मध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अशा विविध थरांवरचा अनुभव मिळणार आहे. ‘आवशीचो घो’ हे गाणं या प्रवासातील एक भावपूर्ण वळण आहे. संगीत, शब्द आणि अभिनयाचं कमाल सादरीकरण यामुळे हे गाणं सर्व वयोगटांसाठी रिलेटेबल ठरणारं आहे.'' 

निर्माते सुजय हांडे म्हणतात, ''जेव्हा आम्ही हे गाणं प्लॅन केलं, तेव्हा आमचा उद्देश फक्त धमाल गाणं देणं हा नव्हता तर नात्यांची गुंतागुंत आणि सहजता दाखवणं होता. दिलीपजी आणि सिद्धार्थ यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनी याला वेगळ्या उंचीवर नेलं आहे.”

'दशावतार'चा टीझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता ‘आवशीचो घो’ गाण्याने या चित्रपटातील भावनिक बाजूही उलगडायला सुरुवात झाली आहे. धमाल आणि हृदयस्पर्शी भावनांचं हे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना नक्की भावेल, अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...