जीटीडीसीतर्फे अष्टविनायक सहलींचे आयोजन
जीटीडीसीतर्फे अष्टविनायक सहलींचे आयोजन
पणजी, 31 ऑक्टोबर – गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अविस्मरणीय अष्टविनायक सहलींचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी अष्टविनायक सहलींचे उद्घाटन केले. लाँचप्रसंगी इतर मान्यवर आणि अधिकारीही उपस्थित होते.
जीटीडीसीचे माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे म्हणाले, ‘गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे अतिशय वाजवी किंमतीत अष्टविनायक सहलींचे आयोजन केले असून त्यामध्ये दर्जेदार प्रवास, दर्शन, वास्तव्य आणि इतर सोयींचा समावेश आहे. या सहलीला चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री वाटते.’
यानिमित्ताने सर्व गणेशभक्तांना महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकाचे दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार असून या सहलीत मयुरेश्वर (मोरगाव), सिद्धीविनायक (सिद्धटेक), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव), गिरीजात्मज (लेण्याद्री), विघ्नेश्वर (ओझर), वरदविनायक (महाड) आणि बल्लाळेश्वर (पाली) यांचा समावेश आहे. ही सहल स्थानिक गोवेकरांना अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणेल.
ही सहल गुरुवारी संध्याकाळी सुरू होणार असून रविवारी संध्याकाळी संपेल. त्यामध्ये तीन दिवस व तीन रात्रींचा समावेश असेल. त्याशिवाय नोव्हेंबर 2019 मध्येही अशा चार सहलींचे आयोजन करण्याचा जीटीडीसीचा विचार आहे.
जीटीडीसीने या सहलींची किंमत प्रती व्यक्ती 5500 रुपये ठेवली असून त्यामध्ये स्वतंत्र गाईड सेवेचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये हॉटेलमधील वास्तव्य आणि प्रवासाचा खर्चही समाविष्ट आहे. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. पिक अपची व्यवस्था पर्यटन भवन पाटो, पणजी येथून संध्याकाळी 7.15 वाजता आणि म्हापसा रेसिडेन्सी येथून रात्री 8 वाजता करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST