चाहत्याकडून हृताला 'ही' अनोखी भेट
रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला 'अनन्या' नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हृताला मिळालेल्या या सुंदर भेटीबद्दल हृता म्हणते, "चाहत्यांचे असे प्रेम बघून खरेच खूप भारावून जायला होते. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि याच प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. 'अनन्या'मधून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. चित्रपट तर माझ्यासोबत आयुष्यभर असणारच आहे. मात्र 'अनन्या'ची ही अंगठीही माझ्यासोबत कायम असेल.''
येत्या २२ जुलै 'अनन्या' प्रदर्शित होणार असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे, तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST