Tuesday, January 10, 2023

दिसतं तसं नसतं... 'वाळवी'चा रहस्यमय

 दिसतं तसं नसतं... 'वाळवी'चा रहस्यमय 

दिमाखदार सोहळ्यात पोस्टरचेही अनावरण 

'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचे जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चे थरारक असे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी 'वाळवी'चे नवीन पोस्टरही झळकले. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. 

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि  गूढ असणाऱ्या 'वाळवी'त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला  १३ जानेवारीला चित्रपटगृहात मिळणार आहेत. 

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, " प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अप्रतिम असतो. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. 

'वाळवी' ही एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच चित्रपटातील  गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे. कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.’’ 

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता 'वाळवी'ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे नक्की !

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...