नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास / फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाने या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होईल.
मोहित टाकळकर दिग्दर्शित, ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर, आम्ही सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत होतो; त्याच दरम्यान कोरोना महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. सर्वांसह सिनेसृष्टी साठी सुद्धा हा एक आव्हानात्मक काळ होता. आता हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. तसेच आमच्या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यावरून असे दिसते की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा जगभरातील चित्रपट महोत्सवाद्वारे जगातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.”
‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक सिनेमागृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल. संपूर्ण इटलीमध्ये चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ते एकाच वेळी ऑन-लाइन सुद्धा उपलब्ध असेल. विधि आणि मोहित हे दोघेही डिजिटल मीटसाठी उपस्थित राहतील आणि चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना वर्चुअल अभिवादन करतील.
फ्लॉरेन्समध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, देश विदेशातील लोकांनी तुमचा चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले यापेक्षा चांगली भावना दुसरी नाही. फ्लॉरेन्समधील एका सुंदर ठिकाणी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे किती प्रेक्षणीय असेल याबद्दल मी उत्सुक आहे.”
अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तापसी पन्नू यासारख्या नामवंत कलाकार ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या पूर्वीच्या आवृत्तीत सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST