Thursday, June 8, 2023

राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजाभाऊ पाटलांची एक आठवण

 राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजाभाऊ पाटलांची एक आठवण.


 आम्ही दोघे, आमच्या दोघांच्या आया आणि ६वर्षांचा मुलगा नचिकेत १९८९साली काश्मीरला गेलो होतो. आमची आम्हीच सगळी व्यवस्था केली होती. श्रीनगरहून जम्मूला आलो, एक रात्र जम्मूत राहिलो. दुसऱ्या दिवशी  संध्याकाळी ५ वाजताच्या गाडीने आम्हांला हरिद्वारला जायचं होतं.       

स्टेशनवर आल्यावर कळलं की गाडी १६ तास लेट आहे. खूप टेन्शन आलं. काय करावं समजेना. बरोबर दोन म्हाताऱ्या आणि एक लहान मुलगा. पाच जणांचं सामानही भरपूर ! सगळे पर्याय आठवले. कोणताही उपयोगाचा नव्हता‌.

एवढ्यात राजाभाऊ समोरून येताना दिसले. मी हिंमत करून त्यांच्याजवळ गेले आणि ओळख नसताना त्यांना आमची सगळी हकीगत सांगितली. ते म्हणाले, " माझं एक काम आटोपून येतो. अर्धा तास थांब " मला वाटलं, एवढा मोठा माणूस ! हा कशाला परत येईल ? यांनी टाळण्यासाठी काही तरी सांगितलं असावं. पण थांबण्याखेरीज काही इलाजच नव्हता.    

साधारण पाऊण तासात ते आले. तो पाऊण तास जाता जात नव्हता. ते आले आणि म्हणाले, " माझ्याबरोबर स्टेशनमास्तरकडे चल. मी सांगतो तसं तिथे सांग " मी सांगितलं, " माझा नवरा आजारी आहे आणि माझी सासू खाष्ट आहे. ती हरिद्वारला गेल्याशिवाय ऐकत नाही. मी एकटी काय करू ? " हे ऐकल्यावर मास्तर विरघळले.  भर गर्दीमधून चार्ट्स् उचलून आमच्यासाठी आत आणले गेले. मास्तर म्हणाले की तुमची पहिली तिकिटं रद्द करा. त्यांचे पूर्ण पैसे मी तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो. रात्री ८.३० च्या  गाडीची तीन तिकिटं मी तुम्हाला देतो.     

हो म्हणणं भागच होतं. आम्ही राजाभाऊंचे पुन्हा पुन्हा आभार मानले. बाहेर पडताना क्लार्क म्हणाला, गाडी स्टेशनात शिरली की मी तुम्हाला आणखी दोन तिकिटं देऊ शकेन की नाही ते सांगतो. मी म्हटलं, कसं काय ? त्यावर तो हसला आणि म्हणाला, आप आम खाओ.      

गाडी स्टेशनमध्ये फक्त पाच मिनिटं थांबणार होती. तेव्हा डबे आतून जोडलेलेही  नसत. आम्ही दोघे सामानाच्या ५/५बॅगा खांद्यावर घेतल्या , दोघांनी एकेका म्हातारीचा हात धरला, नचिकेतने एका आजीचा हात धरला आणि सज्ज राहिलो. गाडी स्टेशनात शिरताच तो म्हणाला, आप का काम हो गया.      

पण तीन तिकिटं दहाव्या डब्यात आणि दोन  दुसऱ्या ! तर्राट धावलो , दोन्ही आज्ज्या, नातू आणि सामान दहाव्या डब्यात चढवलं आणि परत पळत येऊन दुसरा डबा गाठला. आत पाऊल टाकलं आणि गाडी सुटली.    

पुढे राजाभाऊंशी खूप चांगली ओळख झाली. त्यांना या प्रसंगाची आठवणही दिली. पण त्यांना काही आठवलं नाही. एका मोठ्या माणसाने जनसामान्यांना सहज केलेली मदत होती ती ! आमच्यासाठी अविस्मरणीय ठरलेली !

Article Courtesy 

शिरीन कुलकर्णी🖋️

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...