‘मनमोहिनी’च्या सेटवर अंकित सिवाच बनला ‘फिटनेस कोच’!
विविध कलाटण्या आणि कथानकाला मिळणाऱ्या वळणांमुळे ‘झी टीव्ही’वर ‘मनमोहिनी’ मालिकेने प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की मोहिनी (रेहना पंडित) स्वत: सियाला (गरिमा सिंह राठोड) ठार करू शकत नसल्याने ती दाई माँ (वंदना पाठक) यांना सियाला ठार मारण्यासाठी कसे ब्लॅकमेल करते. राम आणि मोहिनी यांच्या मीलनात आता फक्त सिया हाच अडथळा असल्याने ती सियाला ठार करण्याचा कसा प्रयत्न करते, हेही दिसेलच.
आपल्या उत्तम अभिनयामुळे रामाची भूमिका साकारणारा अंकित सिवाच हा अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. तसेच त्याच्या तगड्या आणि तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे त्याचे चाहते त्याला प्रोत्साहन देत असतात. पण त्याचे चाहते आणि प्रेक्षकांना एक गोष्ट कदाचित ठाऊक नसेल की अंकितने सेटवरच उभारलेल्या आपल्या जिममुळे त्याने आपले शरीर पीळदार बनविले आहे. या मालिकेसाठी त्याला प्रदीर्घ काळ चित्रीकरण करावे लागत असल्याने त्याला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेगळा वेळच मिळत नाही. म्हणूनच आता दोन प्रसंगांच्या चित्रीकरणादरम्यान मोकळा वेळ मिळाला की अंकित आपले व्यायामाचे कपडे चढवितो आणि सेटवरच उभारलेल्या जिममध्ये घाम गाळतो. इतकेच नाही, तर आपल्या सर्व सहकलाकारांनाही आपल्याप्रमाणे नियमित व्यायाम करण्यास अंकितने भाग पाडले आहे. त्याबरोबर तो आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी कोणता आहार करावा आणि कधी-कसे खावे, याचेही मार्गदर्शन करीत असतो. आपले सहकारी आपल्यासारखेच तंदुरुस्त राहावेत, अशी त्याची इच्छा आहे.
आपल्या या व्यायामाबद्दल आणि नव्या छंदाबद्दल अंकितने सांगितले, “नियमित व्यायामाची मला खूप आवड असून या व्यायामामुळे मी माझ्या शरीरातील ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित करीत असतो. मालिकेच्या प्रदीर्घ चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे मला स्वतंत्रपणे जिममध्ये जाऊन व्ययाम करणं शक्य होत नाही. तेव्हा मी सेटवरच एक जिम उभारली असून त्यात वेळ मिळेल तेव्हा मी व्यायाम करतो. शिवाय सेटवर उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये मी प्रयोगही करून बघत असतो. उदाहरणार्थ, खुर्चीचा उपयोग मी पुश-अपसाठी करतो, तर एका आडव्या बारला लटकून मी दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करतो. आता माझे सहकलाकारही व्यायाम करू लागले आहेत आणि ते स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहून मला आनंद होतो.”
अंकित, तुझे उदाहरण नक्कीच प्रेरणादायक आहे. आता तुझे चाहतेही तुझ्याप्रमाणेच निमयमित व्ययाम करून आपली प्रकृती सुदृढ ठेवतील, अशी आशा करुया.
पाहा ‘मनमोहिनी’ सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST