प्रवेश अर्ज : "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे" - ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार , ‘कल्पना एक २०१९'
‘कल्पना एक आविष्कार अनेक’ - २०१९ (वर्ष ३३ )
विषय सूचक: ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार,विषय- "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे"
एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस् तित्व' आणि ‘चार मित्र’- कल्याण संयुक्तपणे आयोजित कै. श्री. "मु.ब.यंदे पुरस्कृत" 'कल्पना एक आविष्कार अनेक' ही स्पर्धा सध्या विशेष चर्चेत आहे ती तिच्या समकालीन विषयामुळे.ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार, यांनी यंदाचा विषय सुचला असून,त्यांनी दिलेली प्रस्तावना पुढीलप्रमाणे
कल्पना एक आविष्कार अनेक २०१९’ या स्पर्धेसाठी मी "स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे" ही कवी नामदेव ढसाळ यांच्या "निमित्त १५ ऑगस्ट ७१" या कवितेतली ओळ सादरीकरणासाठी विषय म्हणून सुचवीत आहे.
"स्वातंत्र्य" या संकल्पनेच्या सर्वपातळ्यांवर सध्या ज्या चिंधड्या उडत आहेत त्या पाहता ही ओळ आज ७१ सालापेक्षा जास्त खरी वाटू लागली आहे. कवी नामदेव ढसाळांनी स्वतंत्र भारतातल्या दलितांच्या स्वातंत्र्यासंदर्भात हा प्रश्न विचारला होता. तो दलित-आदिवासी यांच्या बाबतीत आजही पूर्णपणे लागू आहेच. पण स्त्री-पुरुष, धर्म, जात, वर्ग आणि देश यांच्यासाठी चालणाऱ्या लढ्यात सर्वसामान्यांची होणारी कोंडी बघता तो सार्वत्रिक झाला आहे. आज सत्ताधारीही स्वतंत्र नाहीत आणि जनताही. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारा, त्यावर गदा आणणारा पुरुष ही आपल्या "पुरुषपणा" च्या प्रतिमेत कैद आहे. घटनेने दिलेलं आचार-विचार-उच्चार स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसंच काय लेखक-कलावंत तरी उपभोगू शकतात का?
आज प्रत्येकावर नजर ठेवली जाते आहे. कुणाचं काहीच खाजगी नाही आणि सोशल मीडियातून लोकच एकमेकांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करायला लागले आहेत. एक व्यक्ती म्हणूनही स्वातंत्र्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे. या संघर्षातून व्यक्तीने वा समूहाने मिळवलेलं स्वातंत्र्य त्या व्यक्ती-समूहापुढे पारतंत्र्याचे नवे पिंजरे उभे करतं का ?
विचार करायला पाहिजे. हा विषय म्हणजे "स्वातंत्र्य" या संकल्पनेची खिल्ली उडवणं नसून या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कराव्या लागलेल्या लढाईचा,चुकवाव्या लागल्या किंमतीचा मिळालेल्या यशाचा अर्थ शोधण्यासाठी केलेलं आवाहन आहे. अर्थात यातून वेगळ्या प्रकारे या विषयाला भिडण्याचं स्वातंत्र्य स्पर्धकांना आहेच.
यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३३ वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्या
लयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.
एकांकिका स्पर्धांच्या आयोजकांमध्ये झालेल्या समन्वयानुसार कोणत्याही मोठ्या स्पर्धांच्या तारखा एकत्र येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली आहे, त्याप्रमाणे स्पर्धेची प्राथमिकफेरी ६ ऑक्टोबरला तर अंतिमफेरी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न होईल.
स्पर्धेचे प्रवेशअर्ज www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन २० ऑगस्टपासून उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST