Wednesday, November 27, 2024

'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे 'मनोमंच' ते 'रंगमंच'

मराठी नाटक समूह आयोजित, 

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे 'मनोमंच' ते 'रंगमंच

हा सोहळा रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न

मराठी नाटक समूह ह्या व्हाट्सऍप समूहाने नेहमीप्रमाणे आपल्या आजवरच्या कारकिर्दीला साजेसा उपक्रम रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात यशस्वी केला.


नामवंत नाट्य सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ह्या ठिकाणी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे, 'मनोमंच' ते 'रंगमंच' स्वगत ... स्वागत ... सादरीकरण हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

सोहळ्याची सुरुवातीला मराठी नाटक समूहाचे तरुण ऍडमिन अभिषेक मराठे , ह्यांनी समूहाच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. हा केवळ व्हाट्सऍप समूह नाही तर नाटकासाठी एकत्र आलेल्या ज्येष्ठ कनिष्ठ हौशी व्यावसायिक रंगकर्मींचा समूह आहे जो व्हाट्सअँप वर कार्यरत आहे असे प्रतिपादन करून व्हाट्सअँप वर असून देखील अनेक विधायक कामे क्षणात निर्णय घेऊन कसे साकारता येतात हे समूहाच्या कार्याने दाखवून दिलेले आहे हे स्पष्ट केले.


संकर्षण कऱ्हाडे ह्या गुणी निवेदकाने आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करून कार्यक्रमाची जोरदार सुरुवात केली. नामवंत व्याख्याते अभिनेते दीपक करंजीकर आणि लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ह्यांनी चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ह्या पुस्तकाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. राजहंस प्रकाशन ह्या नामवंत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ह्या प्रकाशनाच्या करुणा गोखले ह्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी ह्या नाट्यप्रवासातील दोन भागांचे अभिवाचन केले आणि मग ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, अभिनेते प्रशांत दामले आणि सुमीत राघवन ह्यांच्या शुभहस्ते द्वितीय आवृत्तीचे स्वागत रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात संपन्न झाले आणि पहिल्या अंकाचा पडदा पडला.

दुसऱ्या अंकाची सुरुवात नीना कुलकर्णी ह्यांनी ध्यानीमनी ह्या नाटकातील उताऱ्याचे अभिवाचन करून केली. त्यानंतर यळकोट ह्या नाटकातील प्रसंग संकर्षण कऱ्हाडे आणि आशुतोष गोखले ह्यांनी सादर केला. त्या नंतर गांधी विरुद्ध गांधी ह्या एकेकाळी प्रचंड गाजलेल्या नाटकातील प्रवेशाचे अभिवाचन रोहिणी हट्टंगडी आणि चंद्रकांत कुलकर्णी हयांनी केले. मग्न तळ्याकाठी ह्या नाटकातील प्रसंग चिन्मय मांडलेकर आणि पूर्वा पवार ह्यांनी सादर केला आणि हॅम्लेट ह्या नाटकातील स्वगत  सुमीत राघवन ह्याने बहारदार सादर केले. मानसी मराठे हिच्या सुंदर कृतज्ञतेने सोहळ्याची सांगता झाली.

मराठी नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत, नवोदित रंगकर्मी आणि रसिकांनी यशवंत  नाट्य मंदिर अक्षरशः फुलून गेले होते. विनामूल्य प्रवेश, काही रांगा राखीव आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्यामुळे रसिकांनी नाट्यगृहावर  दुपारी 03.00 वाजल्यापासूनच हजेरी लावली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ह्या सोहळ्याचे आयोजन केले असल्यामुळे कुठेही गडबड गोंधळ न होता हा सोहळा संपन्न झाला.  यशवंत नाट्यगृहाचे मुख्य प्रेक्षागार आणि बाल्कनी हाऊस फुल्ल झालेली असल्याने अनेक नामवंत रंगकर्मी आणि रसिकांनी अक्षरशः उभं राहून पायऱ्यांवर बसून ह्या सोहळ्याचा आनंद लुटत होते हे फारच कौतुकास्पद वाटले.

जिगिषा अष्टविनायक ह्या संस्थेच्या सहकार्याने मराठी नाटक समूहाने आपल्या दर्जेदार कार्याची परंपरा कायम ठेवली. येणाऱ्या रसिकांचे स्वागत चाफ्याचे फुल आणि पेढा देऊन करण्यात आले. सरोज स्वीट्स, चेंबूर च्या मनीषा मराठे ह्यांनी सोहळ्याचा गोडवा सुंदर पेढा देऊन द्विगुणित केला.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...