Wednesday, August 17, 2022

 आपला ‘गोदावरी’ येतोय, दिवंगत चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना खास श्रद्धांजली अर्पण करत, अभिनेता जितेंद्र जोशी यांनी जिओ स्टुडिओजचा पुढील मराठी चित्रपट 'गोदावरी'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली

अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या बहुचर्चित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशी यांनी त्यांचे दिवंगत मित्र, प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित 'गोदावरी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत.

जितेंद्र जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं.  मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे”

गोदावरी ही निशिकांतची (जितेंद्र जोशी) कथा आहे, एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे, आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला.

आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. अलीकडेच, या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला.



याचबरोबर गोदावरीचा जागतिक प्रीमियर व्हँकुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ आणि एशिया पॅसिफिक प्रीमियर न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये झाला होता.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...